महाविकास आघाडीत फुट – शिवसेनेला गाजर दाखवीत हाती भोपळा
शिवसेना एकाकी, सेनेची मते फुटल्याने ओमराजे निंबाळकर यांना धक्का
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन व व्हॉइस चेअरमनपदाच्या निवडणूक महाविकास आघाडीत अखेर फुट पडली.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आले ती महाविकास आघाडी साठी पुढाकार घेणारी शिवसेना मात्र एकटी पडली.शिवसेनेचे 5 संचालक निवडून आले होते त्यापैकी एक संचालक् भूम परांड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवसेनेच्या गटातून फुटून काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला. एकंदरीत या निवडणुकीत शिवसेनेला भोपळा मिळाला. 11 विरुद्ध 4 मतांनी काँग्रेस व राष्ट्रवादी विजयी झाले. एकत्र निवडून आले मात्र सत्ता स्थापनेचा संसार वेगळा मांडला. एकही जागा न मिळवता पराभव झाला असतानाही आजच्या घडामोडीनंतर भाजपच्या गोटात मात्र आनंदोत्सव होता, शिवसेनेला काही न मिळाल्याने भाजप व आमदार राणा समर्थक यांना गुदगुल्या झाल्या. शिवसेनेचे 3 आमदार व 1 खासदार असतानाही शिवसेना सत्तेचे गणित व मनधरणी करू शकली नाही. काँग्रेसचे नेते बसवराज पाटील,मधुकरराव चव्हाण व राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे हे या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.
खासदार ओमराजे निंबाळकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. ग्रामीण भागात सहकारमध्ये शिवसेनेचे प्राबल्या असतानाही जिल्हा बँकेत त्यांच्या काही हाती लागले नाही. शिवसेनेने भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना शह देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केली, भाजप व आमदार राणा यांचा पराभव केला मात्र विजयाचा आनंदोत्सव शिवसेनेला जास्त काळ टिकवता आला नाही. काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्र आल्याने शिवसेना सपशेल तोंडावर पडली. भाजपचा एकत्र आल्यावरच पराभव करू शकतो हे गाजर दाखवीत शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुरब्बी नेत्यांनी हाती भोपळा दिला असेच म्हणावे लागेल. शिवसेनेने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शक्ती ,युक्ती पणाला लावली होती.कालच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा झाला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी या नाट्यमय घडामोडी घडल्या. आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत् समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे गणित फिस्कटणार असल्याचे सध्या तरी दिसते.
चेअरमनपदी काँग्रेसचे बापूराव पाटील तर व्हॉइस चेअरमनपदी राष्ट्रवादीचे मधुकर मोटे विजयी झाले. महाविकास आघाडी जिल्हा बँक निवडणुकीत एकत्र भाजप विरुद्ध लढली होती, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सर्वांना प्रत्येकी 5 जागावर विजय मिळाला होता मात्र शिवसेनेच्या पदरात काही पडले नाही. मतदान प्रक्रिया पार पडल्यावर नूतन चेअरमन बापूराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की कोणताही फॉर्मुला ठरला नव्हता आणी यापुढेही ठरला नाही त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला काही मिळेल अशी अपेक्षा नाही. निवडणूक प्रक्रिया वेळी खासदार ओम राजे निंबाळकर हे स्वतः उपस्तिथ होते मात्र सत्तेच्या गोंधळाची स्तिथी पाहून त्यांनी काढता पाय घेतला. शिवसेनेने चेअरमन पदासाठी संजय देशमुख व व्हॉइस चेअरमन पदासाठी बळवंत तांबारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी आम्ही काँग्रेसची काही मते फोडल्याचा दावा केला गेला होता मात्र शिवसेनेला त्यांची मते फुटण्यापासून रोखता आले नाही.
संचालक नानासाहेब व्यंकटराव पाटील, सुनील मधुकरराव चव्हाण,बापूराव माधवराव पाटील,बळवंत हरिश्चंद्र तांबारे, मधुकर सुखदेव मोटे, ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील, नागप्पा शरणप्पा पाटील, विक्रम उत्तम सावंत, प्रविणा हनुमंत कोलते,अपेक्षा प्रकाश आष्टे, संजय रामचंद्र कांबळे,मेहबूब पाशा याकूब पटेल, संजीव वसंतराव पाटील,संजय गौरीशंकर देशमुख, सुरेश माणिकराव बिराजदार आदी उपस्थित होते.
बँकेचा चेअरमन पदाचा पूर्व इतिहास –
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात सर्वाधिक काळ 2002 ते 2009 हा 7 वर्ष 2 महिने प्रशासकाचा राहिला. सुरेश माणिकराव बिराजदार यांनी सर्वाधिक काळ चेअरमन पद उपभोगले,त्यांनी 19 मे 2015 ते आजवर असा 6 वर्ष 9 महिने चेअरमनपद भूषविले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्थापननेनंतर सर्वात पहिले चेअरमनपद भूषविण्याचा मान हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव देवराज चव्हाण यांना मिळाला. चव्हाण हे 14 ऑगस्ट 1984 ते 14 ऑगस्ट 1986 या काळात 2 वर्ष चेअरमनपदी होते.कै पवनराजे निंबाळकर यांनी त्यांच्या कार्यशैलीने जिल्हा बँकेचा काळ गाजावीला. कै पवनराजे हे 27 नोव्हेंबर 1996 ते 6 मे 2002 या 5 वर्ष 5 महिने या काळात चेअरमनपदी होते.
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी आजवर 11 चेअरमन झाले त्यात मधुकरराव चव्हाण, नानासाहेब हरिश्चंद्र पाटील,विक्रम दगडोबा पडवळ,महारुद्र आनंदराव मोटे, लक्ष्मण आनंदराव मोटे,शिवाजीराव प्रतापराव चालूक्य,पवनराजे निंबाळकर, बापूराव माधवराव पाटील, पंडितराव प्रलहादराव टेकाळे, सुरेश बिराजदार हे होते त्यात मधुकरराव चव्हाण, विक्रम पडवळ,महारुद्र मोटे,बापूराव पाटील या 5 जणांनी दोन वेळेस चेअरमनपद भीषविले. पवनराजे यांच्या नंतर शिवाजीराव चालूक्य यांनी 5 वर्ष 10 महिने चेअरमनपदी होते. बापूराव पाटील यांनी 2 वेळेस 4 वर्ष 9 महिने पद भूषविले. सर्वात कमी काळ हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांचा प्रतिष्ठेचा होता.
आजवर जिल्हा बँकेच्या काळात 17 व्हॉइस चेअरमन झाले त्यात सर्वाधिक काळ हा भाजपचे नेते पाटील चिंतामणराव शिंदे यांचा 19 मे 2005 ते आजवरचा असा 6 वर्ष 9 महिने असा आहे.उपाध्यक्ष म्हणून विनायकराव पाटील, विक्रम पडवळ,अशोकराव इंद्रजीतराव जवळगे,नानासाहेब बळीराम जाधवर, शिवाजीराव चालूक्य,शिवाजी गाढवे, सुरेश बिराजदार,ऍड सुभाषराव मोरे, शिवाजी गणपतराव पाटील, पंडितराव प्रल्हादराव टेकाळे, राहुल काकासाहेब पाटील, नारायण किसनराव समुद्रे, संजय गौरीशंकर देशमुख व कैलास शिंदे यांचा समावेश आहे