लोकअदालत – विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला सर्वे
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानबाद येथील डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये सहभागी होत न्यायालयीन कामकाजाची माहिती घेऊन लोक अदालत बाबत पक्षकार यांना काय वाटते याचा सर्वे केला. लोक अदालतीचे महत्व, त्याचा नागरिकांना होणारा फायदा, न्यायालयीन कामकाज व प्रक्रिया यासह अन्य बाबी विद्यार्थ्यांना जवळून शिकता आल्या. उस्मानाबाद येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली. संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते त्यात विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्मानाबाद,कळंब, तुळजापूर, परांडा, लोहारा,भूम,वाशी व उमरगा या तालुक्यात झालेल्या लोक अदालतीत सहभाग नोंदविला.
विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही जी शिंदे, प्रा. नितीन कुंभार, प्रा.डॉ संजय आंबेकर,प्रा.इकबाल शाह, डॉ एम.डी गोलवाल यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थी यांच्या वेगवेगळ्या सर्वे टीम तयार करून सर्वे कसा करावा याबाबत मार्गदर्शन व समन्व्य साधला. या अभ्यासपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपातील कायद्याच्या प्रक्रियांची माहिती झाली.
जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष के. आर. पेठकर, जिल्हा न्यायाधीश एम. आर. नेरलेकर, जिल्हा न्यायाधीश व्ही.जी. मोहिते, विशेष न्यायाधीश एस. डी. जगताप, तर्द्थ जिल्हा न्यायाधीश पी.एच. कर्वे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सदस्य सस्ते, कौटुंंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली डंबे-आवले, जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर, विधीज्ञ मंडळ अध्यक्ष नितीन भोसले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वसंत जाधव यांनी लोक अदालतीच्या कामकाजाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.