उस्मानाबादच्या खेळाडूंना मिळणार हक्काचे क्रीडा संकुल, नियोजित तालुका क्रिडा संकुलाच्या जागेची आमदार कैलास पाटील यांनी केली पाहणी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहर व तालुक्यातील खेळाडूंना सरावासाठी त्यांच्या हक्काचे क्रीडा संकुल उभे करावे अशी मागणी सातत्याने होत होती इतर मैदान उपलब्ध नसल्याने जिल्हा क्रीडा संकुलावर भार पडत होता. येथे वॉकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय सुरू होती. आमदार कैलास पाटील यांनी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह जागा उपलब्धीबाबत आढावा घेतला होता. एमआयडीसीत जागा उपलब्ध असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. आमदार पाटील यांनी उद्योग उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन खेळाडूंच्या हितासाठी ही जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी सविस्तर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने आज संबंधित अधिकाऱ्यांसमवेत जागेची आमदार कैलास पाटील यांनी पाहणी केली.
याप्रसंगी ही जागा क्रीडा विभागास हस्तांतरित करण्यासाठी जलद गतीने प्रक्रिया राबवावी, संकुलाचा विकास करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करावे, अंदाजपत्रक तयार करताना वाढती लोकसंख्या, खेळाडूंना आवश्यक सोयी, सुविधा याचा आढावा घेऊन त्या उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव व उपाययोजना तरतूदी करण्याचे आदेश आमदार पाटील यांनी दिले.