मानवता हाच खरा धर्म – हिंदू मुस्लिम बांधव एकत्र नमाज व हनुमान चालीसा पठण करणार
उस्मानाबाद – समय सारथी
मानवता हाच खरा धर्म असा नारा देत उस्मानाबाद जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत नमाज व हनुमान चालीसा यांचे एकत्र पठण करणार आहेत. हिंदू मुस्लिम ऐक्याची पार्श्वभुमी असलेल्या उस्मानाबाद येथील केशेगाव येथे उद्या 3 मे रोजी सायंकाळी 6.52 वाजता हिंदू मुस्लिम बांधव एकत्र मगरीब नमाज अदा करणार आहेत त्यानंतर त्याच ठिकाणी 7.07 वाजता हिंदू मुस्लिम बांधव एकत्र हनुमान चालीसा पठण करणार आहेत त्यानंतर शीरखुर्मा वाटप केले जाणार आहे. हिंदू मुस्लिम एकत्र नमाज व चालीसा पठण हा उपक्रम समाजिक व जातीय सलोखा जपणारा ठरणार आहे.
केशेगाव येथे 3 मे रोजी नमाज व हनुमान चालिसा पठण बरोबरच विज्ञान व अध्यात्म या विषयावर कीर्तन जुगलबंदी होणार आहे. प्रसिद्ध डॉ जितेंद्र रावसाहेब डोलारे हे अध्यात्म व विज्ञान याची काय सांगड आहे हे कीर्तनाच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहेत. कीर्तन जुगलबंदी बरोबरच ज्ञानदान सोहळा आयोजित केला आहे त्यात मानवता व हिंदू धर्म यावर हभप महादेव शास्त्री बोराडे, मानवता व मुस्लिम धर्म यावर मौलाना महमद कासमी, मानवता व महात्मा बसवेश्वर यावर प्रफुल्ल शेटे, मानवता व बौद्ध धर्म यावर डॉ उज्जवल देशमुख आणी मानवता व जैन धर्म त्या निळेश झरेगावकर असे त्या त्या धर्माचे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाला साहित्यिक सदानंद मोरे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक, उत्तमराव शिंदे सरकार, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सौ यमुनाबाई बसवंत अप्पा वाघाळे याच्या जीवन शताब्दी सोहळा निमित्त हे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. शार्तीअप्पा व शरणाप्पा वाघाळे माजी श्री संत मीराबाई संजीवन समाधी सप्ताह सोहळा समिती आणि रमजान ईद महोत्सव सोहळा समिती मधील मुस्लिम बांधवानी हे कार्यक्रम आयोजित केले असून याला केशेगाव, शिंदेवाडी, विठ्ठलवाडी,खामसवाडी,अनसुर्ड,बेंबळी, रुईभर व उमरेगव्हाण या गावातील ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.