स्वप्न साकारणार – राज्य देणार आपला हिस्सा, उस्मानाबाद – सोलापुर रेल्वेसंदर्भात महत्वाची घोषणा
शिवसेना आमदार कैलास पाटील यांची माहिती
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद-तुळजापुर-सोलापुर रेल्वे मार्गाच्या निधीसंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली, एकुण निधीपैकी राज्याने पन्नास टक्के वाटा उचलण्याबाबत तसा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवण्याच्या सुचना परिवहनमंत्री श्री.परब यानी दिल्याची माहिती आमदार कैलास घाडगे-पाटील यानी दिली.
परिवहनमंत्री श्री.परब यानी बोलावलेल्या बैठकीला रेल्वेचे मुख्य अभियंता सुधीर पटेल,परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,सहसचिव राजेंद्र होळकर यांची उपस्थिती होती.
मंजुर असलेल्या महत्वाच्या रेल्वेमार्गाबाबत निधीच्या बाबतीत मोठ्या अडचणी येत असल्याने याबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक बोलाविण्याची मागणी आमदार घाडगे पाटील यांनी परिवहनमंत्री श्री.परब यांच्याकडे केली होती.त्यानुसार बैठक आयोजीत करण्यात आली,बैठकीच्या माध्यमातुन अनेक गोष्टीसमोर आल्या आहेत,त्यामुळे भविष्यात काय कार्यवाही करायची याबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सचिव यांनी उस्मानाबाद-तुळजापुर-सोलापुर रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारच्यावतीने 8 जानेवारी 2019 रोजी पन्नास टक्के वाटा उचलण्याबाबत रेल्वे विभागाला पत्र दिले होते.हा प्रकल्प 904 कोटीचा असुन राज्याने त्यातील पन्नास टक्के वाटा उचलण्याची तयारी त्या पत्राद्वारे दाखविली होती.मात्र नंतर जी कार्यवाही करणे अपेक्षित होते ते काहीच झाले नाही.पत्र दिल्यानंतर मंत्रीमंडळासमोर हा विषय येणे अत्यावश्यक होते,त्याला मंत्रीमंडळाची मंजुरी देखील गरजेची होती.तसे काहीच न झाल्याने निधीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.त्यातही केंद्र सरकारने रेल्वेमार्ग जाहीर केल्यानंतरही घोषीत होणाऱ्या सलग तीन अर्थसंकल्पात केंद्राची आर्थिक तरतुद शंभर टक्के दाखविली असल्याची बाब या बैठकीत समोर आली. नुकत्याच झालेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पामध्ये केंद्राने त्यात दुरुस्ती केली असुन केंद्राचा पन्नास टक्केच वाटा दाखवला आहे. यापुढे हा रेल्वेमार्ग अधिक गतीने पुर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याबाबत सदरील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
रेल्वे विभागाकडून सविस्तर प्रस्ताव घेऊन राज्य परिवहन विभागाने वित्त विभागाची मान्यता घेऊन सदर प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीसमोर ठेवण्याच्या सुचना मंत्री महोदयांनी दिल्या आहेत. सद्यस्थितीला वस्तुस्थिती समोर आली असुन यामध्ये कोणाची चुक? कोण बरोबर? यामध्ये न पडता राज्यशासनाने हा रेल्वेमार्ग सूरु करण्यासाठी पाऊले उचलली असल्याचे समाधान आमदार घाडगे-पाटील यांनी व्यक्त केले आहे. पुढील काळात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास आमदार घाडगे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.