धनुष्यबाण विरुद्ध मशाल, निष्ठावान विरुद्ध आयात अशी थेट रंगतदार लढत
धाराशिव – समय सारथी
धाराशिव कळंब मतदार संघाचा महायुतीचा तिढा अखेर सुटला असुन अजित पिंगळे यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. पिंगळे हे भाजपचे तालुका अध्यक्ष असुन त्यांनी भाजपमधुन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करुन उमेदवारीचा सामना जिंकला आहे. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर धाराशिव येथील अनेक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना डावलत एकनाथ शिंदे यांची साथ दिली मात्र त्यांना डावलून आयात नेत्याला उमेदवारी देण्यात आल्याने नाराजीचा सुर आहे. धाराशिव विधानसभा शिवसेनेला सुटलेली असतानाही भाजप आमदार राणाजगजीतसिंह यांचा उमेदवार निवडीत हस्तक्षेप दिसुन आला ते यात सरस ठरले. उमेदवार निवडीत त्यांचा निर्णय अंतीम ठरला.
धाराशिव विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी शिवसेना उबाठा गटाकडुन विद्यमान आमदार कैलास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीकडुन शिवसेना शिंदे गटाकडुन अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकंदरीत धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी थेट लढत होणार असुन निष्ठावान विरुद्ध आयात उमेदवार अशीही बाजु असणार आहे. पक्षफुटीच्या राजकीय संकटावेळी निष्ठा राहिलेल्या नेत्यांना नारळ देण्यात आले आहे तर इन्कमिंग नेत्यांचा सत्कार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पिंगळे यांना एबी फॉर्म देऊन पक्ष प्रवेश दिला व खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केले. दाखवलेल्या विश्वासाबद्दल पिंगळे यांनी आभार मानले.
शिवसेना शिंदे गटाकडुन सुधीर पाटील, धनंजय सावंत, केशव सावंत, सुरज साळुंके, नितीन लांडगे यांच्यासह ठाकरे गटातून शिंदे गटात आलेले शिवाजी कापसे हे इच्छुक होते मात्र त्यांना डावलून आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मर्जीतील पिंगळे यांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली. लोकसभेला सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा सुटलेली असताना भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना ताई पाटील यांचा भाजपमधुन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेण्यात आला व उमेदवारी देण्यात आली, तोच पॅटर्न धाराशिव कळंब विधानसभावेळी वापरण्यात आला, लोकसभेप्रमाणे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा हस्तक्षेप विधानसभेला राहिला.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली, त्यावेळी शिवसेना उबाठा गटाकडुन ओमराजे हे विजयी झाली त्यांना धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघात 60 हजार 423 मतांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांना 76 हजार 735 तर ओमराजे यांना 1 लाख 37 हजार 158 मते पडली. सत्ता कोणाची का असेना ? चालक मालक कोणी असो ? पक्ष व जागा कोणालाही सुटेना मात्र अंतीम ग्रीन सिंगल हा डॉ पाटील घराण्याचा असतो हे राणाजगजीतसिंह पाटील यांनी पुन्हा लोकसभेप्रमाणे विधानसभेला सिद्ध करुन दाखविले.
अजित पिंगळे हे भाजपचे तालुका अध्यक्ष असुन ते आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या जवळचे मानले जातात, त्याच्या उमेदवारीसाठी आमदार पाटील हे विशेष प्रत्यनशील होते. पिंगळे यांनी 2019 साली अपक्ष निवडणुक लढवली होती त्यांना त्यावेळी 20 हजार 570 मते पडली होती, त्यांचे शिटी हे चिन्ह होते. नुकतेच पिंगळे यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती, त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे अनेक इच्छुक नेते उपस्थितीत होते.
धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघात कैलास घाडगे पाटील यांना 87 हजार 488 मते पडली होती तर राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर यांना 74 हजार 21 मते पडली होती, कैलास पाटील हे 13 हजार 467 मतांनी विजयी झाले होते. सत्ता परिवर्तन वेळी त्यांनी मातोश्री प्रति निष्ठा जपत उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले. शेतकरी, पीक विमा, मराठा आरक्षण यासह अन्य मुद्यावर त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले, 2024 च्या निवडणुकीत ते उभे असुन दांडगा जनसंपर्क व थेट लोकांशी नाळ ह्या त्यांच्या जमेच्या बाजु आहेत.
धाराशिव विधानसभा मतदार संघात 2019 साली 3 लाख 53 हजार 36 मतदार होते त्यापैकी 2 लाख 14 हजार 321 मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला होता, त्यावेळी 60.71 टक्के मतदान झाली होते त्यात 1 लाख 16 हजार 308 पुरुष तर 98 हजार 11 महिला मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदा 2024 साली 3 लाख 74 हजार मतदार असुन 2019 च्या तुलनेत 21 हजार 87 मतदार यांची वाढ झाली आहे. 1 लाख 95 हजार 838 पुरुष तर 1 लाख 77 हजार 638 महिला मतदार आहेत. धाराशिव शहरात सर्वाधिक मतदार असुन त्यांचा कौल महत्वाचा ठरणार आहे.