धन्यवाद तरी कसे मानु ? नतमस्तक तुमच्यापुढे.. आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया
धाराशिव – समय सारथी
धाराशिव विधानसभा मतदार संघांसाठी महाविकास आघाडीकडुन आमदार कैलास पाटील यांची शिवसेना उबाठा गटाकडुन उमेदवारी जाहीर झाली असुन ते सोमवारी शहरात रॅली काढुन अर्ज भरणार आहेत, त्यांना अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम म्हणुन एका शेतकऱ्यांने स्वतः कष्टाने कमाविलेले पैसे देऊ केले आहेत. धन्यवाद तरी कसे मानु ? नतमस्तक तुमच्यापुढे अशी प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी दिली. यावेळी संग्राम देशमुख उपस्थितीत होते.
शिवसेना पक्षातील थोडसरवाडी येथील शाखा प्रमुख प्रदीप भारत लोमटे, एक सामान्य शेतकरी निसर्गाशी लढत पै-पै जमा केलेली.. कुटुंबाचा गाडा ओढत त्यांनी पक्षासाठी, आपल्यासाठी दाखवलेल्या निष्ठेचे मोल कोणत्याही किमतीत करता येत नाही असे आमदार पाटील म्हणाले. विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी दिवसरात्र एक करून जमलेले 10 हजार रुपये सुपूर्द केले. हे एक निष्ठावंत, सच्चा शिवसैनिकच करू शकतो. कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या विचाराशी प्रामाणिक असलेले हे खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक.. कुठे फेडायचे ऋण या सगळ्या प्रेमाचे ?त्यांचे हे प्रेम, निष्ठा पाहून लढण्यासाठी हजार हत्तीचे बळ अंगी संचारले.. आपल्या सर्वांच्या या स्नेहाचा मी कायम पाईक राहून, लढेन अन् प्रत्येक संकटावर मात करून तुमचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रत्येक क्षण समर्पित करेन, हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो असे पाटील म्हणाले.