छत्रपती संभाजी महाराज यांची तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून दिलगिरी – पत्रक जारी
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची गैरसोय झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंदिर संस्थानने लेखी प्रसिद्धिपत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या दौऱ्यावेळी त्यांना कुलाचार, पूजा विधी करता याव्यात यासाठी आवश्यक त्या बाबींची काळजी घेण्याचे आदेश काढले आहेत.
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांना प्रवेश नाकारल्यानंतर महाराष्ट्रात मंदिर संस्थानच्या कारभारावर टिकेची झोड उठली होती त्यानंतर मंदीर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली आहे.
श्री तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून देऊळ कवायत नियमावली नुसार पुजारी, सेवेकरी, मानकरी यांचे अधिकार विहित आहे. छत्रपती संस्थान कोल्हापूर यांचे परंपरेने चालत आलेले कुलाचार आजही नियमित सुरु आहेत. 9 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज हे दर्शनासाठी आले असता कलम 36 चे अनुपालनमुळे त्यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याबाबत गैरसोय झाल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे छत्रपती संभाजी राजे याचे दौऱ्यावेळी, दर्शन वेळी नियमित कुलाचार पूजाविधी करावेत जेणेकरून गाभरा प्रवेशाबाबत त्यांचे परंपरागत अधिकाराच्या बाबतीत गैरसोय होणार नाही व देऊळ कवायत कलम 36 चे अनुपालन देखील होईल याबाबत आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावे असे मंदीर प्रशासनाने आदेशीत केले आहे.
संभाजी महाराज यांना ही वागणूक दिल्यावर सकल मराठा समाज आक्रमक झाला होता व राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला होता. तुळजापूर देवस्थान हे पूर्वापार कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या मालकीचे होते. छत्रपती संभाजीराजे यांचे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर भारत सरकारच्या स्वाधीन केले मात्र छत्रपती घराण्याच्या पूर्वापार प्रथा परंपरा आजही इथे पाळल्या जातात. दररोज भवानी मातेला पहिला नैवेद्य व अभिषेक हा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा असतो. भवानी माता निद्रा घेते तो पलंग देखील कोल्हापूरचे छत्रपती महाराज अर्पण करतात. त्याच पलंगावर भवानी माता निद्रा घेते. मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती घराण्याने शेकडो एकर जमीन दान दिली आहे असे असतानाही त्यांना त्यांच्या परंपरागत हक्कापासून वंचित ठेवले गेले.
तुळजापूर हा भाग पूर्वी हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असताना सुद्धा निजामाने देखील कधीही इथे हस्तक्षेप केला नाही. ब्रिटिशांच्या काळात देखील ब्रिटिशांनी कधीही इथे हस्तक्षेप केला नाही किंवा कोणते नियम छत्रपती घराण्यावर लादले नाहीत मात्र त्यांना अडवल्याने नाराजीचा सूर उमटला मात्र आता मंदीरने दिलगिरी व्यक्त केल्याने वादावर पडदा पडला आहे.