छत्रपती संभाजी महाराज अवमान प्रकरण – तहसीलदार कोल्हे व व्यवस्थापक शितोळे यांना कारणे दाखवा नोटीसा
प्रशासकीय कारवाई का करू नये ? याचा खुलासा मागवीला
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान केल्या प्रकरणी मंदिर तहसीलदार योगिता कोल्हे व सहायक धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये ? असे नोटीसीत नमूद असून सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कारडे यांनी ही नोटीस काढली आहे. प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
अवमान प्रकरणी कारवाईसाठी तुळजापूरकरांनी काल तुळजापूर शहर बंद ठेवले होते व कारवाईचे निवेदन दिले होते त्या अनुषंगाने आता प्रशासकीय कारवाईसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. तुळजाभवानी गाभाऱ्यात जिल्हाधकारी यांनी प्रवेश बंदी केली आहे त्यामुळे महाराज यांना अडविले असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येते.
छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील भवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात. तुळजाभवानी मंदीर संस्थानने य प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांची गैरसोय झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंदिर संस्थानने लेखी प्रसिद्धिपत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या दौऱ्यावेळी त्यांना कुलाचार, पूजा विधी करता याव्यात यासाठी आवश्यक त्या बाबींची काळजी घेण्याचे आदेश काढले आहेत.
छत्रपती संभाजी महाराज हे दर्शनासाठी आले असता कलम 36 चे अनुपालनमुळे त्यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याबाबत गैरसोय झाल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत मंदिर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे छत्रपती संभाजी राजे याचे दौऱ्यावेळी, दर्शन वेळी नियमित कुलाचार पूजाविधी करावेत जेणेकरून गाभरा प्रवेशाबाबत त्यांचे परंपरागत अधिकाराच्या बाबतीत गैरसोय होणार नाही व देऊळ कवायत कलम 36 चे अनुपालन देखील होईल याबाबत आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावे असे मंदीर प्रशासनाने आदेशीत केले आहे.
तुळजापूर देवस्थान हे पूर्वापार कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या मालकीचे होते. छत्रपती संभाजीराजे यांचे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर भारत सरकारच्या स्वाधीन केले मात्र छत्रपती घराण्याच्या पूर्वापार प्रथा परंपरा आजही इथे पाळल्या जातात. दररोज भवानी मातेला पहिला नैवेद्य व अभिषेक हा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा असतो. भवानी माता निद्रा घेते तो पलंग देखील कोल्हापूरचे छत्रपती महाराज अर्पण करतात. त्याच पलंगावर भवानी माता निद्रा घेते. मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती घराण्याने शेकडो एकर जमीन दान दिली आहे असे असतानाही त्यांना त्यांच्या परंपरागत हक्कापासून वंचित ठेवले गेले.
तुळजापूर हा भाग पूर्वी हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असताना सुद्धा निजामाने देखील कधीही इथे हस्तक्षेप केला नाही. ब्रिटिशांच्या काळात देखील ब्रिटिशांनी कधीही इथे हस्तक्षेप केला नाही किंवा कोणते नियम छत्रपती घराण्यावर लादले नाहीत मात्र त्यांना अडवल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.