धाराशिव – समय सारथी
परंडा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असुन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडुन एबी फॉर्मसह राहुल मोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करीत बंडाचे निशाण फडकविले आहे. मोटे यांनी भुम तहसीलदार कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला त्यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भुम परंडा वाशी मतदार संघातुन माजी आमदार कै ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांना उमेदवारी घोषित केली असुन एबी फॉर्म दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्म दिला असुन पाटील हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी आज उमेदवारी अर्ज पक्षाच्या एबी फॉर्मसह दाखल केला आहे. या मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असुन बंडखोरीमुळे डोकेदुःखी वाढली आहे. बंडखोरी शामणार की मैत्रीपुर्ण लढत होणार याकडे लक्ष लागले आहे.
परंडा या मतदार संघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी एकास एक लढत होणार अशी स्तिथी असतानाच राहुल मोटे यांनी आज उमेदवारी अर्ज खरेदी केल्याने मैत्रीपुर्ण लढतीच्या चर्चेला ऊत आला आहे. सलग 3 टर्म आमदार असतानाही माजी आमदार राहुल मोटे यांचे नाव राष्ट्रवादी पक्षाने जाहीर केले नाही, सेनेने उमेदवार जाहीर केला व खुद्द पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिला. परंडा मतदार संघात महायुतीकडुन शिवसेनेचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यांनी गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सलग 3 टर्म आमदार राहिलेले व त्यांनंतर 1 वेळेस विधानसभा लढविलेले राहुल मोटे यांना नाकारून रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. राहुल मोटे हे 2004, 2009, 2014 असे सलग 3 टर्म आमदार होते तर त्यांचे वडील महारुद्र बप्पा मोटे हे 1985 व 1990 असे 2 टर्म आमदार होते त्यानंतर 1995 व 1999 असे 2 टर्म ज्ञानेश्वर पाटील हे आमदार होते त्यांचे 3 ऑक्टोबर रोजी निधन झाले होते त्यांचे पुत्र रणजीत यांना शिवसेना उबाठा गटाने उमेदवारी दिली आहे. मोटे यांच्या घरात 25 वर्ष आमदारकी राहिली मात्र त्याला प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी सुरुंग लावला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मोटे यांना 73 हजार 772 मते पडली होती तर सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती.