जामीन फेटाळला – ‘या’ 18 आरोपीसह चेअरमन विजय दंडनाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार
धाराशिव कोर्टाचा निकाल – वसंतदादा बँकेतील करोडो रुपयांच्या घोटाळेबाजांचे धाबे दणाणले
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या करोडो रुपयांच्या घोटाळ्यातील 18 आरोपी संचालक व इतरांचा अटक पुर्व जामीन कोर्टाने फेटाळला असुन कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. जामीन फेटाळल्याने फरार आरोपी तत्कालीन चेअरमन विजय दंडनाईक यांच्यासह घोटाळेबाजांचे धाबे दणाणले असुन त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कोर्टाने जामीन फेटाळल्याने पोलीस त्यांना कधी अटक करतात याकडे ठेवीदार व फसवणूक झालेले कर्जदार यांचे लक्ष लागले आहे, दरम्यान पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती शेजाळ यांनी दिली.
घोटाळ्याच्या या प्रकरणात सर्व आरोपी संचालक यांच्या वतीने ऍड अमोल वरुडकर तर सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ऍड शरद जाधवर यांनी बाजू मांडली. आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ हे स्वतः सुनावणीसाठी कागदपत्रासह हजर होते. जवळपास 20 ठेवीदार यांनी कोर्टात हजर होत त्यांची कशी फसवणूक झाली हे वकीलामार्फत सांगितले. जिल्हा व सत्र न्यायाधीश बागे पाटील यांनी हा निर्णय दिला.
संचालक असलेले ऍड बिराजदार, गणेश दत्ता बंडगर, गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, रामलिंग करजखेडे, सी ए असलेले भीमराव ताम्हाणे, पृथ्वीराज विजय दंडनाईक, विष्णुदास रामजीवन सारडा,कमलाकर आकोसकर, शुभांगी प्रशांत गांधी, व्यवस्थापक दीपक देवकते, महादेव गव्हाणे, सुरेखा विजय दंडनाईक, लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा या 18 जणांचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे. चेअरमन विजय दंडनाईक यांनी जामीन अर्ज केला नव्हता ते वगळता इतर संचालक यांनी अर्ज केला होता. जामीन फेटाळल्याने अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान दंडनाईक यांच्या वतीने त्यांचे वकील ऍड अमोल वरुडकर यांनी सर्व आरोप फेटाळले असुन कायदेशीर लढा देणार असल्याचे सांगितले.
ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रभात सहकारी बँकेने 1 कोटी 81 लाख ठेवले होते त्यांना 2 कोटी 31 लाख देणे असताना ते मुदत संपूनही दिले नाही. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ करीत आहेत. ठेवीदार संरक्षण कलम लागल्याने चेअरमन यांच्यासह काही जणांची जेलवारी निश्चित मानली जात आहे. बँक बुडविल्याने अनेक ठेवीदार व कर्जदार यांचे संसार यामुळे उघड्यावर आले आहेत.
विजय दंडनाईक यांनी पतसंस्था, दूध संघ यांच्यासह साखर कारखाना बुडविला असुन त्यातून शेतकरी व लोकांना करोडोचा गंडा घातला आहे. ते घोटाळेही यानिमित्ताने चर्चेला आले असुन तपास यंत्रणाच्या रडारवर आले आहेत.अनेक जणांचे सातबारे विश्वासाने घेऊन त्यावर लाखों रुपयांचे कर्ज घेऊन विश्वासाने गळा कापला. कर्जाच्या नोटीसा आल्याने धास्तीने अनेकांचा जीव घेतला तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
दंडनाईक कॉम्प्लेक्समध्ये कागदोपत्री अनेक उद्योग थाटले गेले व ते सुरु असल्याचे दाखवत कर्ज लाटले.एकप्रकारे जणू दंडनाईक कॉम्प्लेक्स इथे कागदावर उद्योगनगरी स्थापन केली गेली असेच चित्र आहे. बोगस फर्मच्या नावाने कर्ज वाटप केले गेले तर आर्थिक लाभाचे धनी चेअरमन व त्यांचे निकटवर्तीय ठरले. बँक घोटाळा पचवण्यासाठी विजय दंडनाईक हे काँग्रेसमधुन भाजप वासीय झाल्याचेही बोलले जात आहे.
वसंतदादा बँकेचे चेअरमन, काही संचालक व कर्मचाऱ्यानी संगणमत करून कार्यकर्ते, नातेवाईक, त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे नावे बनावट फर्म बनवून पुरेशे तारण न घेता लाखो रूपयांचे कर्ज वाटप केले. काही कर्जदारांना तर लाखो रूपयांचे ओव्हर ड्राफ दिले. जवळच्या जवळपास 200 लोकांना लाखो रूपयांचे कर्ज वाटले. काही कर्जदारांच्या कर्जाची रक्कम बचत खात्यावर जमा होताच, त्याच क्षणी व त्याच दिवशी चेअरमन दंडनाईक यांच्या बचत खात्यावर सर्व कर्जाची रक्कम वर्ग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीमध्ये गंभीर स्वरूपाच्या बाबी दिसून आल्याने वसंतदादा बँकेचा बँकींग परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला, परिणामी वसंतदादा बँकेचे मोठे ठेवीदार अडचणीत आले.