तुळजाभवानी गाभाऱ्यात प्रवेश – 2 जणावर 6 महिने मंदिर प्रवेश बंदीची कारवाई
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजाभवानी देवीच्या एका पूजाऱ्यासह अनधिकृत बोगस पूजाऱ्यावर 6 महिने मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भक्तांसोबत अनधिकृतपणे प्रवेश केल्याने तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने कारवाई केली असून पुजारी अलोक काकासाहेब शिंदे व अंगद अंगद सलगर या दोघांवर 6 महिने मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली आहे. मंदिरातील सुरक्षा रक्षक यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करून धमकी देऊन गाभाऱ्यात प्रवेश केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थांनचे तहसीलदार तथा प्रशासन व्यवस्थापक यांनी ही कारवाई केली आहे.
20 मे शुक्रवारी अलोक शिंदे हे मंदिराच्या चोपदार दरवाज्याजवळ आले असता त्यांनी सुरक्षा रक्षक यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ केली तसेच तुम्ही आडवे आलात तर मार अश्या, मला कोणी हात लावला तर एक एकाला कापून काढीन अश्या शब्दात मारण्याची धमकी दिली व चोपदार दरवाज्यामधील लाकडी बाकडा लाथ मारून सरकावून 7 व्यक्तींना जबरदस्तीने देवीच्या मुख्य गाभाऱ्यात घेऊन गेले. तसेच अनधिकृत पुजारी अतुल अंगद सलगर यांनी एका नवदामपत्याला गाभाऱ्यात नेहून दर्शन करून दिल्याचा अहवाल सुरक्षारक्षक यांनी दिला. या सर्व बाबी सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने मंदिर प्रशासनाने तात्काळ दखल घेत देऊळ ए कवायतचे कलम 24 व 25 प्रमाणे दोघांवर 6 महिने मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली आहे तर 12 महिने मंदिर प्रवेश बंदी का करू नये अशी लेखी कारणे दाखवा नोटीस बजावली असून याचा खुलासा 7 दिवसात करण्यास सांगितले आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात ज्या पूजाऱ्याची पाळी आहे त्या व्यतिरिक्त अन्य पुजारी व व्यक्तींनी प्रवेश करू नये असे आदेश देऊळ कवायत कलम 36 नुसार काढले आहेत, या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असल्याने गेल्या काही महिन्यात अनेक पूजाऱ्यावर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे.