स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याच्या हालचालींना वेग – उद्या उस्मानाबाद उपकेंद्राला समितीची भेट व बैठक
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे, स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याबाबत अहवाल सरकारने मागितला आहे. उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक उद्या उस्मानाबादेत भेट देऊन आढावा बैठक घेणार आहेत. विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय निंबाळकर यांनी याबाबत माहिती दिली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे असून उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याच्या हालचालीना आता वेग आला आहे. उद्याच्या बैठकीला उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व संस्थांचालक , प्राचार्य , खासदार , आमदार व लोकप्रतिनिधी हजर राहणार आहेत. उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ करावे अशी मागणी गेली अनेक वर्षांपासून आहे. उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्रा ची स्वतंत्र इमारत असून या ठिकाणी विविध विभागचे इमारत, वसतिगृह अन्य सुविधा आहेत. उद्या होणाऱ्या बैठकीत सध्या कार्यरत असलेली महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचा, त्यातील विद्यार्थी संख्या, पदे, उपलब्ध सुविधा यांचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकी नंतर स्वतंत्र विद्यापीठाचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. ही बैठक महत्वाची आहे.