बोगस आधार कार्ड आधारे मतदार नोंदणी अर्ज – तुळजापूर विधानसभा मतदार संघातील प्रकार
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिले आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांना गुन्हा नोंद करण्यास सांगितले आहे.
बोगस आधार कार्ड, रहिवासी दाखले व इतर कागदपत्रे वापरून तुळजापूर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात फॉर्म 6 भरून अर्जाची नोंदणी करण्यात आली आहे, हे अर्ज बीएलओ स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. बोगस मतदार नोंदणीचे हे मोठे रॅकेट असुन हजारोंच्या संख्येने असे अर्ज दाखल केले आहेत मात्र वेळीच हा प्रकार समोर आल्याने बोगस मतदार नोंदणीचा डाव उघड झाला.
आरोही उमेश सगाटे, नीलिमा शेखर रबाळे,शैलेश किशोर सालगे, तुषार पंकज इनागटे या 4 जणांच्या नावे फॉर्म 6 ( नवीन मतदार नोंदणी ) अर्ज भरला आहे. अर्ज भरताना जे आधार कार्ड जोडण्यात आले ते नंबर व कार्ड अस्तित्वात नसुन त्याचा इनरॉलमेंट नंबर व वेळ एकच आहे त्याचा अर्थ हे सगळे बोगस कार्ड आहेत. त्यांचे वय व फोटो या इतर बाबी पाहता त्या कुठेही जुळत नाहीत. हे सर्व जण हंगरगा नळ या गावातील रहिवासी असल्याचे दाखवुन करण्यात आली आहे, त्यांच्या बोगस आधारकार्डवर हंगरगा गावाचा पत्ता देखील आहे.
विशेष म्हणजे हे या गावचे नागरिक नसुन त्यांना गावात कोणीही ओळखत नाही. फॉर्म 6 भरताना त्यांनी स्थानिक नागरिक असल्याचे काही पुरावे जोडले आहेत ते ही बोगस आहेत. याबाबत अमोल शिवाजीराव जाधव यांनी निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे तक्रार केली आहे.
तुळजापूर मतदार संघात 410 मतदान केंद्र असुन 3 लाख 82 हजार 467 मतदार आहेत त्यात 30 हजार 625 नवीन नोंदणी केलेले मतदार आहेत तर अजुनही नवीन नावे नोंदविणे सुरु आहे. हीच संधी साधत तुळजापूर विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणीसाठी बोगस अर्ज केले आहेत त्यासाठी एक मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. तुळजापूर तालुक्यातील हंगरगा गावासह अन्य गावात बोगस नावाने अर्ज नोंदणी केली आहेत.