धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील जिजाऊ चौक भागातील नागरिक व शालेय मुला मुलींना दिलासा देणारी बातमी असुन या भागात आनंद नगर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी मंजुर करण्यात आली आहे. या भागात पोलीस चौकी होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
धाराशिव शहरातील जिजाऊ चौक परिसरात पोलीस चौकी मंजूर करणे बाबतची मागणी विधान परिषदेचे माजी आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याचं बरोबर त्यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, त्यांच्या पाठपुरव्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सर्व बाबींचा विचार करुन प्रस्ताव पाठवला होता त्याला मंजुरी मिळाली आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी याबाबत सरकारचे आभार मानले आहेत.
जिजाऊ चौक भागात रहदारी वाढली असुन अनेक शाळा, क्लासेस आहेत. मुलींच्या छेडछाडीसह, हाणामाऱ्या, चोरीच्या घटना असे प्रकार घडत होते त्यामुळे इथे पोलीस चौकी आवश्यक होती, ही बाब ओळखून आमदार धस यांनी मागणी केली. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एक प्रकारे भेटच मिळाली आहे.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना महाराष्ट्र पोलीस नियमावली १९९९ भाग-१ ( प्रशासन ), मधील नियम क्र. ४ (४) नुसार प्रदान असलेल्या अधिकारान्वये पोलीस अधीक्षक, धाराशिव यांना पोलीस ठाणे आनंदनगर अंतर्गत जिजाऊ चौक पोलीस चौकी निर्माण करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आली आहे. या पोलीस चौकीस मनुष्यबळ पुरवावे तसेच चौकी सुरू करण्यासाठी आवश्यक तो आवती/अनावती खर्च हा मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा व त्यांबाबतचा अनुपालन अहवाल या कार्यालबास सादर करावा असे आदेश अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांनी दिले आहेत.