दिशाभूल – पीक विमा प्रकरणी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल
200 कोटी कोर्टात जमा करुन बँकेत फिक्स डिपॉजिट होणार – शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे तूर्तास जमा होणार नाहीत
उस्मानाबाद – समय सारथी
खरीप 2020 पिक विमा प्रकरणी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलेला दावा खोटा ठरला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत समोर आल्यानंतर खासदार ओमराजे यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे.
पिक विमा कंपनीला आणि विमा कंपनीच्या एजन्टला सुप्रीम कोर्टाचा दणका, पिक विम्याचे 200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे कंपनीला आदेश… असे खासदार ओम राजे यांनी पोस्ट केले होते त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर 200 कोटी मिळेल अशी अशा पल्लवीत झाली होती मात्र सुप्रीम कोर्टाने ही रक्कम कोर्टात जमा करुन ती अंतिम आदेशापर्यंत राष्ट्रीयकृत बँकेत फिक्स डिपॉझिट करण्यास सांगितले आहे त्यामुळे तूर्तास तरी शेतकऱ्यांना खरीप 2020 चा पिक विमा मिळणार नाही हे मात्र निश्चित.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020 चा पिक विमा मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. खरीप 2020 च्या पिकविम्याचे प्रकरणी सुप्रीम कोर्टाने काही अटीवर अंतरीम आदेश दिले आहेत.
शेतकऱ्यांना पिक विमा देण्याच्या औरंगाबाद उच्च न्यायालयच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची काही अटीवर तात्पुरती स्थगिती दिली असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पिक विमा मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
औरंगाबाद उच्च न्यायालयाने बजाज अलायन्स कंपनीला उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास 3 लाख 57 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 510 कोटींचा पिक विमा देण्याचे आदेश दिले होते.या आदेशा विरोधात विमा कंपनीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
200 कोटी रुपये विमा कंपनीने सहा आठवड्यात सुप्रीम कोर्टात जमा करण्याचे आदेश देत औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या पिक विमा देण्याच्या आदेशाला अंतरीम स्थगिती दिली आहे.हे पैसे 6 आठवड्यात जमा न केल्यास औरंगाबाद उच्च न्यालयाच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.
विमा कंपनीने जर 200 कोटी रुपयांची रक्कम 6 आठवड्यात कोर्टात जमा केली तर पुढील आदेश होईपर्यंत 200 कोटींची ती रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत फिक्स डिपॉझिट (मुदत ठेव) करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या पिक विमा मिळवून देण्याच्या मुद्यावर श्रेयवादाची लढाई जोरात सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने विमा कंपनीला 200 कोटी जमा करण्याचे आदेश दिले असून ही रक्कम शेतकऱ्यांना खात्यावर जमा करण्यात येणार असल्याच्या पोस्ट खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर केल्या होत्या मात्र ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नसून ती कोर्टात जमा करुन पुढील सुनावणीपर्यंत फिक्स डिपॉजिट केली जाणार आहे.