वेगळे वळण- फक्राबादचे सरपंच बिक्कड यांच्या गाडीवर गोळीबार प्रकरण
पवनचक्की ठेकातुन हल्ला झाल्याचा पुरवणी जबाबात संशय – तपास सुरु
वाशी – समय सारथी, शोएब काझी
उस्मानाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यध्यक्ष तथा वाशी तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. गोळीबाराचा हा प्रकार दिल्ली येथील रेन्यू सूर्या रोशनी कंपनीच्या पवनचक्की टेंडरवरून झाला असल्याचा पुरवणी जबाब बिक्कड यांनी दिला आहे. कंपनीचे के राजा कुमार व कंपनीचा वेंडर कुलदीप देशमुख यांनी घडवून आणला असावा असा संशय बिक्कड यांनी जबाबात व्यक्त केला आहे. या पवनचक्की कंपनीचे काम उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागात सुरु असून त्यांना मोठा राजकीय वरदहस्त आहे.या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून तपासाची चक्रे झपाट्याने फिरवण्यास सुरवात केली आहेत.
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह सहाय्यक पोलीस एम रमेश यांच्यासह पोलीस निरीक्षक सुरेश दळवे, पोलीस उप निरीक्षक पवन निंबाळकर यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करीत आहेत. या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी जाऊन भेटी दिल्या आहेत.
बिक्कड यांनी दिलेल्या जबाबात असे म्हण्टले आहे की, रेन्यू सूर्या कंपनी ही घाटपिंप्री व चांदवड येथे पवनचक्की प्लांट सुरु करणार असल्याचे कळल्याने त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजर वसीम अख्तर यांची भेट घेऊन काम करण्याची व भागीदार होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर अख्तर याने के राजा कुमार व कुलदीप देशमुख यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले व मी संपर्क केला असता पहिली मिटिंग मुंबई व नंतर पुणे येथे झाली,अनुभव नसल्याचे सांगत राजा यांनी नकार दिला. त्यानंतर माझ्यावर मी राजस्थान येथून मुंबई येथे आलो असताना माझ्यावर खोटी एनसी दाखल केली.
कुलदीप देशमुख यांचा मला 17 जून रोजी व्हाट्स अँपवर मिस कॉल आल्याने त्यांना फोन केला असता देशमुख म्हणाले की, के राजा कुमार आता तुम्हाला प्रेमाच्या भाषेमध्ये बोलणार नाहीत. कंपनीने 30 बॉडीगार्ड साईटवर ठेवले आहेत. त्यामुळे मी देशमुख यांना म्हणालो की, तुम्ही कंपनीने शेतकऱ्याच्या जमिनी कमी दराने घेते असून तुमचे कामगार महिलांची छेड करीत असल्याने तुमचे कंपनी विरोधात आंदोलन करणार आहे असे सांगून फोन कट केला. त्यानंतर संध्याकाळी माझ्यावर गोळीबार गोळीबार झाला, हा प्रकार राजा व देशमुख यांनी घडवून आणल्याचा संशय लेखी जबाबात केला आहे.