गाडीचं दार उघडून पळालो, ट्रकवाला देवदूतासारखा भेटला, सूरतहून सुटलेल्या आमदाराचा थरारक प्रवास
उस्मानाबाद – समय सारथी
“ज्या शिवसेनेने मला जिल्हाप्रमुख, आमदार केलं, त्यांच्याशी प्रतारणा करणं मला पटलं नाही” अशा भावना उस्मानाबादमधील शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केल्या.
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती नेलेले उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील आणि अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर वर्षा बंगल्याबाहेर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांना आपल्या थरारक सुटकेचा प्रवास कथन करण्यास सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे तुम्ही आग्य्राहून सुटका करुन घेतलीत, तुम्हाला कशाप्रकारे गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला, कसं नीच राजकारण सुरु आहे ते सांगावं, अशी विनंती राऊतांनी केली. “ज्या शिवसेनेने मला जिल्हाप्रमुख, आमदार केलं, त्यांच्याशी प्रतारणा करणं मला पटलं नाही” अशा भावना यावेळी कैलास पाटलांनी व्यक्त केल्या.
त्या रात्री मला एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बंगल्यावर बोलावण्यात आलं. ते नगरविकास मंत्री असल्यामुळे तिथे काही काम असेल, असं वाटलं आणि मी गेलो. तिथून मला ठाणे महापौर बंगल्यावर नेण्यात आलं. एक गाडी बदलून आम्ही निघालो. मला वाटलं की कुठे घरी वगैरे जायचं असेल. पुढे ठाणे गेलं, वसई-विरार गेलं, मला या भागातील फारशी माहिती नाही, पण शहरं संपत गेली आणि मला लक्षात आलं की काहीतरी वेगळं घडतंय. पुढे बॉर्डरवर चेकपोस्ट दिसला, तेव्हा मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्याला चुकीच्या दिशेने नेलं जातंय, हे माझ्या लक्षात आलं.
पुढे नाकाबंदी होती, तेव्हा ते म्हणाले की चालत येता का. मी या संधीचा फायदा घेतला. तिथे दीड किमीपर्यंत ट्राफिक होतं. मी गाडीचं दार उघडून बाहेर पडलो आणि डिव्हायडर ओलांडून मुंबईच्या दिशेने निघालो. ३००-४०० मीटर गेल्यावर माझ्या लक्षात आलं, की आता हे आपल्या मागे येतील. म्हणून मी पुन्हा सूरतच्या दिशेने असलेल्या ट्राफिकमध्ये शिरलो. ट्रकच्या रांगांमधून चालत राहिलो. एका बाईकवाल्याने मला गावापर्यंत सोडलं. तिथे एका हॉटेलजवळ काही ट्रकवाल्यांना विचारलं, काही खासगी वाहनांना विचारलं, पण त्यांनी मला सोडलं नाही.
यावेळी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन सांगितलं, काही खासदारांना कॉल केला. मोबाईलची बॅटरी ७-८ टक्क्यावर आली होती. ती संपत जाईल म्हणून मी लाईव्ह लोकेशन पाठवू शकलो नाही. पुढे एका यूपीच्या ट्रकवाल्याने माझी विनंती मान्य केली. या काळात पाऊस सुरुच होता, मी भिजत होतो. त्याने मला दहिसर टोलनाक्याजवळ सोडलं. तो अक्षरशः देवदूतासारखा भेटला. मी त्याच्यासोबत सेल्फीही काढला. मी कोण आहे हे त्याला सांगितलं नाही, पण माझी अडचण त्याने ओळखली. ज्या शिवसेनेने मला जिल्हाप्रमुख, आमदार केलं, त्यांच्याशी प्रतारणा करणं मला पटलं नाही, असंही सांगायला कैलास पाटील यांनी सांगितले.