आत्महत्या प्रकरणात आरोपी महिलेचा जामीन नाकारला – बालाजी भंडारे परिवाराचा अनैतिक संबंधातुन हत्येचा आरोप
धाराशिव – समय सारथी
राज्य उत्पादक शुल्क विभागातील कॉन्स्टेबल बालाजी भंडारे यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक आरोपी महिला शुभांगी नंदू जगताप हिचा जामीन जिल्हा न्यायाधीश व्ही जी मोहिते यांनी नाकारला आहे अशी माहिती ऍड विशाल साखरे यांनी दिली.
अनैतिक संबंधातुन बालाजी यांनी कंटाळून आत्महत्या केल्या प्रकरणी आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसात नोंद करण्यात आला असुन ही आत्महत्या नसुन हत्या असल्याचा आरोप भंडारे यांच्या कुटुंबाने केला असुन ही बाब ऍड साखरे यांनी कोर्टात मांडली आहे.
हत्येच्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा अशी विनंती कोर्टात करण्यात आली असुन तसा तपास करण्याबाबत पोलीस अधिकारी यांना सूचित करावे अश्या सुचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे त्यादृष्टीने तपास होणे गरजेचे आहे.
आरोपी महिला सध्या धाराशिव येथील कारागृहात आहे.भंडारे हे साईराम नगर येथे किरायाने राहत होते त्या दरम्यान महिलेचे संबंध निर्माण झाले. घरमालकीण सतत फोन करुन व अनैतिक संबंध ठेवण्यासाठी पैशाची मागणी करुन त्रास देत होती. काय करावे हे कळत नसल्याने ते परेशान होते असे फिर्यादीत नमूद केले होते.
घटनास्थळी अनेक गोष्टी या संशयास्पद असुन महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. भंडारे यांनी स्वतःच्या रूममध्ये आत्महत्या न करता घरमालकीण शुभांगी हिच्या बेडरूममध्ये कशी केली. घरमालकीण हिने पोलीस किंवा इतरांना न सांगता लवकर प्रेत काढले.
आरोपी महिलेला अटक केल्यावर पोलीस कोठडी दरम्यान तिच्याकडे बालाजी याच्या हातातील सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली ती तिच्याकडे कशी आली याचे उत्तर ती देऊ शकली नाही. पोलीस तपास सुरु असल्याने व परिस्थितीजन्य पुरावे व बाबी पाहून कोर्टाने जामीन नाकारला असल्याचे आदेशात नमूद केले आहे.