‘महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे वर्तमान आणि त्यापुढील आव्हाने’ यावर चर्चासत्र संपन्न
पुणे – समय सारथी
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सर्वंकष चित्र मांडणाऱ्या ‘जनस्वास्थ्य’ या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता’च्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते झाले. यानिमित्त ‘महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे वर्तमान आणि त्यापुढील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते. आरोग्य मंत्री प्रा डॉ सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना आणि उपक्रमांची सविस्तर माहिती यावेळी दिली.
‘जनस्वास्थ्य’ या कॉफी टेबल बुकमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सध्याचे चित्र, त्यात घडलेले सकारात्मक बदल, विविध योजनांचा नागरिकांना होणारा लाभ, करोना किंवा स्वाइन फ्लू या साथ रोगांच्या काळात आरोग्य व्यवस्थेची निर्णायक भूमिका, सध्याची आरोग्य शिक्षणाची दिशा, त्यातील आवश्यक बदल, शल्यक्रियेचा इतिहास आणि त्यातील प्रगती, साथीच्या रोगांचा मुकाबला, फॅमिली डॉक्टर संकल्पनेची आताच्या काळातील गरज, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उत्तम ठेवण्यामधील मानसिक आरोग्याची भूमिका, रोगनिदान चाचण्यांमुळे काही आजारांची पावले वेळीच ओळखून ते कसे दूर ठेवता येऊ शकतात याची मांडणी, मुंबई, पुणे, नागपूर येथील सरकारी रुग्णालयांचा इतिहास आणि आरोग्य व्यवस्थेतील योगदान आदी विषयांवरील लेख तज्ज्ञ डॉक्टरांनीच लिहिले आहेत. या कॉफी टेबल बुकच्या निमित्ताने राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा एक सर्वंकष दस्तऐवज तयार झाला आहे.
प्रकाशन समारंभानिमित्त आयोजित ‘महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे वर्तमान आणि त्यापुढील आव्हाने’ चर्चासत्रात जनआरोग्य अभियानाचे समन्वयक डॉ. अनंत फडके, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर विभागाचे चीफ इंटेन्सिव्हिस्ट डॉ. प्रसाद राजहंस, प्रयास आरोग्य गट आणि जहांगीर व रुबी हॉल क्लिनिकशी संलग्न वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्मिता जोशी आणि राज्याच्या आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार सहभागी झाले होते. यावेळी आयईसी ब्युरोचे डॉ. कैलास बाविस्कर, सहाय्यक संचालक डॉ. संजीवकुमार जठार, आरोग्य विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
लवकरच आरोग्य हक्क कायदा…
राज्यातील जनतेला सुदृढ आरोग्याचा अधिकार देणारा आरोग्य हक्क कायदा लवकरच आणणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले. आरोग्य हक्क कायदा हे आपले या विभागातील ध्येय असुन यामुळे रुग्णांची सोय होणार असुन त्यांना चांगले व आरोग्यदायी आयुष्य जगण्याचा अधिकार मिळणार आहे. ग्रामीण भागात रुग्णांची सोय होणार असुन आरोग्य विभागाला बळकटी मिळणार आहे. आरोग्य हक्क कायदा हे आपले स्वप्न असुन त्यादृष्टीने पावले उचलली आहेत, गेल्या 24 महिन्यात 42 क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत.