धाराशिव – समय सारथी
समाजात अनेक समस्या आहेत. प्रत्येक समस्येवर प्रत्येकच जण तोडगा काढू शकणार नाही. पण एका बोधकथेतील दिव्याप्रमाणे, अंधार्या खोलीच्या कोपर्यात प्रकाशमान झालेला दिवा त्या कोपर्यातील अंधार तर नक्कीच दूर करू शकतो. एकल महिला, निराधार ज्येष्ठ आणि अनाथ बालकांना आधार देण्याच्या प्रमुख उद्देशाने मंगरूळ येथे स्थापन झालेली आणि जिल्हाभर विस्तारत जाणारी ‘वात्सल्य सामाजिक संस्था’ याच प्रकारे समाजातील एक कोपरा प्रकाशमान करण्यासाठी तेवत आहे. या तेवणार्या ज्योतीला बळ देण्यासाठी पुरस्कार आणि सहकार्याच्या रुपाने असंख्य हात समोर येत गेले. त्यातून ही ज्योत अधिकाधिक प्रकाशमान होत चालली आहे. ही ज्योत चेतविण्यामागील प्रेरणा असणारे ते समाजनिष्ठ हात आहेत श्री. उमाकांत मिटकर यांचे. त्यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली ही संस्था आता आपल्या पंखाखाली अनेकांना निवारा देते आहे.
उमाकांत मिटकर हे राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य आहेत. आपल्या या जबाबदारीची पहिली टर्म पूर्ण केल्यानंतर काही खंडाने प्रशासन व्यवस्थेने विश्वास टाकून त्यांच्यावर दुसर्या टर्मची जबाबदारी सोपविली. मुंबईत या कार्याद्वारे वरिष्ठ पोलिसी अधिकार्यांच्या अन्याय-अत्याचाराला बळी पडलेल्या असंख्य पीडितांना दिलासा देत असतानाच आपल्या सामाजिक बांधिलकीतून त्यांनी आपल्या जन्मभूमीच्या परिसरात ही संस्था उभी करण्याचे ठरविले. या संवैधानिक पदामागील वलय, हे मात्र संस्थेच्या स्थापनेमागील कारण नाही. या स्थापनेमागील मुख्य प्रेरणा आहे ती उमाकांत मिटकर यांनी सुमारे दोन दशके झोकून देऊन केलेल्या भटक्या विमुक्तांच्या उत्थानकार्यातील योगदानात. सन २००२ पासून यमगरवाडीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक वाटचालीचा श्रीगणेशा झाला आणि कार्यकर्ता म्हणून सुरू झालेली ती वाटचाल आता आश्वासक मार्गदर्शक नेतृत्वाच्या रुपाने विस्तारत आहे.
‘पालावरची शाळा’ या उपक्रमातून उमाकांत यांच्या समाजकार्याचा श्रीगणेशा झाला आणि त्यानंतर अल्पावधीतच राज्यभर हे काम विस्तारले. एक चिरस्थायी काम उभे राहावे या साठी उमाकांत यांनी प्रारंभापासूनच मेहनत घेतली आणि शेकडो कार्यकर्त्यांची फळी उभी करत या कार्याला भक्कम पाया निर्माण करून दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांमध्ये विकसित झालेला एक समर्पित स्वयंसेवक ही त्यांची मूळ ओळख. त्यांनी आधी उमरगा येथील त्रिकोळी रोडवरील पालावरची शाळा चालविली. त्यानंतर त्यांनी संघाचे तालुका व जिल्हा प्रचारक अशा जबाबदार्या निभावल्या,त्यानंतर त्यांच्याकडे विभागातील विविध जिल्ह्यांत असलेल्या पालावरच्या शाळांची जबाबदारी सोपविण्यात आली. या वाटचालीत प्रत्येक जबाबदारीला पूर्ण न्याय देत त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक परिपक्व होत गेले आणि त्यातूनच त्यांच्यावर राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाची जबाबदारी दोन वेळा सोपविण्यात आली.
उमाकांत मिटकर यांच्या या समाजनिष्ठ वाटचालीची कथा मांडणारे ‘डिव्हाईन जस्टिस’ हे पुस्तक लिहिण्याची संधी प्रस्तुत लेखकाला (दत्ता जोशी) मिळाली. या निमित्ताने या अफलातून व्यक्तिमत्त्वाचे असंख्य पैलू जवळून अनुभवता आले. आमची पहिली भेट झाली होती तेव्हा ते यमगरवाडीच्या प्रकल्पातील एक समर्पित कार्यकर्ते होते. त्या वेळचे उमाकांत आणि आज असलेले उमाकांत यांच्यात अनेक बदल झाले आहेत. अर्थात झालेले बदल हे कालमानानुसार आणि जबाबदारीनुसार आहेत. मात्र काही गुण मात्र अद्याप जसेच्या तसे आहेत. जमिनीवर घट्ट असलेले पाय आणि आकाशाला स्पर्शणारी सामाजिक तळमळ या दोन गोष्टी मात्र अगदी जशाच्या तशा आहेत. त्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नाही.
बालपणी झालेले सुसंस्कार, मधल्या काळात एका असामाजिक संघटनेचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव, त्यातून मनात डोकावून गेलेल्या विद्रोही भावना आणि सद्सद्विवेकबुद्धी शाबूत राहिल्याने त्यातून वेळीच त्यांनी काढून घेतलेले अंग हा त्यांच्या आयुष्याचा पूर्वार्ध. रा. स्व. संघाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यात अमुलाग्र बदल झाला आणि यमगरवाडीच्या प्रकल्पात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडले. एक झपाटलेला कार्यकर्ता आपल्या भक्कम मनोबलाच्या आधारावर ठामपणे उभा राहतो आणि भटक्या विमुक्तांच्या वस्तीत राहून, त्यांच्यातील एक होऊन त्यांच्यातील परिवर्तनाचे कारण आणि साधन बनतो. हे सगळे लिहिणे सोपे असते, प्रत्यक्षात तेथे उभे राहून ते जगणे कठिण असते. सगळीकडे पसरलेली घाण… उघडीनागडी फिरणारी पोरं… मारामार्या चालू असलेली वस्ती… हातातला भाकरीचा तुकडा मातीत पडलाय, पुन्हा तोच उचलून तोंडात घालणारी मुलं… वस्तीवरच्या पुरुषांनी दारू प्यायलेली आणि बायकाही झिंगलेल्या आहेत… वार्याचा झोत येईल तशी कोंबडीची पिसं वार्यावर उडतायत… अशा परिस्थितीत त्यांच्या कामाला सुरुवात झाली आणि ऐन दिवाळीच्या दिवशी सारा दिवस उपाशीपोटी राहिल्यानंतर रात्री जगण्याचा पर्याय म्हणून डुकराचे मटण आणि मागून आणलेल्या भाकरीचा तुकडा तोंडात घेऊन त्यांना सत्वपरीक्षा द्यावी लागली. एका माळकरी घरातील माणसासाठी यापेक्षा मोठी परीक्षा कोणती?
समाजिक बांधिलकी त्यांच्या रक्तात भिनलेली आहे. सामाजिक सुधारणांची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. यमगरवाडीच्याच प्रकल्पात कार्यरत शिक्षिका प्रणिता शेटकार यांच्याशी त्या काळात त्यांनी आंतरजातीय विवाह केला आणि महत्वाचे म्हणजे आपल्या संसारातील पहिल्या अपत्याच्या, सिद्धीच्या जन्माच्या वेळी ‘सेव्ह गर्ल चाईल्ड’चा सामाजिक संदेश देणारा सोहळा त्यांनी आयोजला. आपल्या अल्प आयुष्यात मोठे जग पाहणार्या उमाकांत यांच्या वाटचालीतील महत्वाच्या टप्प्यांची दखल घेत आजवर त्यांना ५० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये युनेस्कोच्या पुरस्कारापासून स्थानिक पुरस्कारापर्यंत अनेक मानाच्या सन्मानांचा समावेश आहे.
एकीकडे वैयक्तिक आयुष्यात हे सारे काम उभे करत असतानाच आपली सामाजिक बांधिलकी प्रमाण मानत त्यांनी वात्सल्य सामाजिक संस्थेच्या स्थापनेसाठी प्रेरणा दिली. त्याद्वारे विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्यांचा शुभारंभ झाला आहे. खरे तर ‘आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचा जिल्हा’ अशी धाराशिव जिल्ह्याची ओळख आहे. मागील काही वर्षांपासून प्रशासन व जिल्हावासीयांच्या योगदानातून ही प्रतिमा बदलते आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात विधायक पद्धतीने सक्रियपणे काम करणार्या विविध सामाजिक संस्थांची यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे. ‘वात्सल्य सामाजिक संस्थे’च्या माध्यमातून समाजातील विधवा, परित्यक्ता आदी एकल महिला, अनाथ मुलांसाठी शैक्षणिक कार्य, ज्येष्ठ निराधार नागरिकांसाठी निवारा, गोसंवर्धन, आरोग्य, वृक्ष लागवड व संवर्धन अशा विविध क्षेत्रात भरीव कार्य करीत ‘वात्सल्य सामाजिक संस्थे’ने आपले वेगळेपण निर्माण केले आहे.कोरोना काळात विस्तारलेल्या ‘वात्सल्यच्या सामाजिक कामात सातत्य राहिले. त्याला आता राजमान्यताही मिळाली आहे.
जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी केलेल्या सामाजिक कार्यांचा गौरव व्हावा व कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, म्हणून महाराष्ट्र शासन दरवर्षी उत्कृष्ट सामाजिक संस्थांना पुरस्कार प्रदान करत असते. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील समिती याची छाननी करते. समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रात काम करणार्या सक्रिय संस्थांचीच निवड ही समिती करते. यासाठी अत्यंत काटेकोर नियमावली असते आणि या प्रक्रियेत पारदर्शकता पाळली जाते. गौरवपत्र, सन्मानचिन्ह व पन्नास हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या आणि आजवर मिळालेल्या अशा निधीतून संस्थेच्या अनेक खर्चांना आधार मिळतो. विशेष लक्षणीय बाब ही आहे, की संस्थेचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक असलेल्या उमाकांत मिटकर यांनाही आजवर अनेक वैयक्तिक पुरस्कार प्रदान झालेले आहेत. या प्रत्येक पुरस्काराची सन्मानराशी त्यांनी आवर्जून ‘वात्सल्य’ला अर्पण केली आहे. एक आगळा सामाजिक संदर्भ आणि दातृत्वभाव त्यांच्यात या निमित्ताने प्रकट होतो.
‘वात्सल्य’सारखे असे असंख्य दीप जागोजागी उजळू लागले की अनेक ठिकाणी दाटलेला अंधार आपोआपच दूर होईल. वंचितांपर्यंत जीवन पोहोचेल. जगण्याची साधने आणि प्रेरणा निर्माण होतील. समाजातील प्रत्येक घटक सक्षम होईल. सारा समाज एकरूप – एकात्म होऊन एकजुटीने उभा राहील आणि त्यातून भारतमातेच्या उन्नतीचे उराशी जपलेले स्वप्न साकार होईल, अशी आशा मनाशी ठेवून ‘वात्सल्य’चे या पुरस्काराच्या निमित्ताने कौतुक करायला हवे आणि जमेल त्या पद्धतीने या आणि अशा असंख्य निरलस सामाजिक कार्यांत प्रत्येकाने आवर्जून योगदान द्यायला हवे, एवढीच अपेक्षा या निमित्ताने करावीशी वाटते.
काही पुरस्कार विविध कार्यांच्या उभारणीसाठी प्रेरणादायी ठरतात तर काही कार्यांना पुरस्कार प्रदान होतात तेव्हा त्या पुरस्कारांचेही महत्व अधोरेखित होत जाते. महाराष्ट्र शासन दरवर्षी विविध जिल्ह्यांतील उत्कृष्ट सामाजिक संस्थांना पुरस्कार प्रदान करीत असते. सन २०२२-२३ साठीचा धाराशिव जिल्ह्याचा ५० हजार रुपये मूल्याचा हा पुरस्कार वात्सल्य सामाजिक संस्थेला प्रदान करण्यात आला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सोहळ्यात प्रदान झालेल्या या पुरस्कारामुळे ‘वात्सल्य’च्या समाजमान्यतेत आणि पुरस्काराच्या विश्वासार्हतेत निश्चितपणे भर पडली. ‘वात्सल्य’च्या समाजनिष्ठेबद्दल…
दत्ता जोशी -प्रेरक लेखक, छत्रपती संभाजीनगर