मुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती – अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांची माहिती
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या जीर्णोद्धाराच्या विविध कामांना दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरुवात होणार असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह अन्य मंत्री, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थितीती असणार आहे. तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी मंदीर जीर्णोद्धार याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. तुळजाभवानी देवीच्या मंदीराच्या व परिसराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचे टेंडर/निविदा प्रसिद्ध झाल्या असुन त्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. मंदीर संस्थानच्या स्वनिधीतुन ही 58 कोटींची कामे केली जाणार आहेत. पावसाळा व नवरात्र उत्सव संपल्यावर विकास कामे सुरु होतील, ती पुर्ण झाल्यावर मंदीर व परिसराचा कायापालट होणार असल्याचे जिल्हाधिकारी ओम्बासे म्हणाले.
तुळजाभवानी मंदीराची विकास कामे ही पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार असुन भाविकांना विविध सुविधा व स्थानिक लोक, बाजारपेठ यांना प्राधान्य दिले जाणार आहे. नवरात्र महोत्सव संपल्यावर ही कामे सुरु होतील, विधानसभा निवडणुक आचारसंहिता किंवा इतर कारणाने विकास कामे शुभारंभ कार्यक्रम वेळेत काही बदल होऊ शकतो असेही जिल्हाधिकारी ओम्बासे म्हणाले. पत्रकार परिषदेला उपविभागीय अधिकारी संजय ढव्हळे, तहसीलदार माया माने, अरविंद बोळंगे यासह अधिकारी कर्मचारी उपस्थितीत होते.
तुळजाभवानी मंदिरातील जतन व दुरुस्ती कामाचे 6 भाग म्हणजे टप्पे करण्यात आले आहेत त्यात पहिला भागात भुयारी मार्ग,यज्ञ मंडप, सभा मंडप व भवानी शंकर मंदीर जतन व दुरुस्ती हे 11 कोटी 36 लाखांचे काम आहे. दुसरा भागात कार्यलयीन, प्रशासकीय इमारत, पोलीस चौकी,खुला प्रेक्षक मंच, गोमूख तीर्थ, दत्त मंदीर, मातंगी मंदीर,कल्लोळ तीर्थ, निंबाळकर महाद्वार,मार्तंड ऋषी मंदीर, टोळ भैरव मंदीर, दीप माळ, शिवाजी महाद्वार व ओवऱ्या,खंडोबा व यमाई मंदीर जतन व दुरुस्ती अशी 12 कोटी 9 लाखांची कामे आहेत.
तिसरा भागात तुकोजीबुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशी, आवश्यकतेनुसार दगडी पायऱ्या, महावस्त्र अर्पण केंद्र जतन व दुरुस्ती अशी 9 कोटी 46 लाखांची कामे आहेत. चौथा भागात महंत तुकोजी बुवा मठावरील ओव्हऱ्या,आराध्य खोलीवरील ओव्हऱ्या, आराध्य खोली दगडी फरशी जतन व दुरुस्ती अशी 9 कोटी 45 लाखांची कामे आहेत.
पाचवा भागात मुख्य प्रवेशद्वार व जिजामाता महाद्वार जतन व दुरुस्तीचे 7 कोटी 21 लाख आणि सहावा भागात लिफ्ट व रॅम्पचे 4 कोटी 25 लाख असे 53 कोटी 84 लाख 47 हजार 7 रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. संभाजीनगर पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहणे यांनी तसा प्रस्ताव पाठवला होता. मंदीरमधील 6 भाग पैकी 1,2,3 व 5 यातील नमुद समाविष्ट कामाची निविदा पुरात्तव विभागाने काढली होती, 29 ऑगस्टपर्यंत निविदा भरण्यात आल्या असुन त्या लवकरच ओपन केल्या जाणार आहेत.
तुळजाभवानी मंदिराचे जतन व दुरुस्ती करताना जुने रूप कायम ठेवले जाणार असुन सर्व कामे पुरात्तव विभागाच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी सांगितले.या कामामुळे मंदीर व तुळजापूरच्या वैभवात भर पडणार असुन पर्यटनाला चालना मिळणार आहे शिवाय नवरात्र, गर्दीच्या दिवशी व्यवस्था करता येणार आहे.