धाराशिव – समय सारथी
पंढरपुरच्या आषाढीवारीत 15 लाखापेक्षा अधिक वारकरी यांचे महाआरोग्य शिबीर यशस्वीरित्या घेऊन रुग्णसेवा केल्याबद्दल आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचा सन्मान करण्यात आला आहे. महाआरोग्य शिबिराची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली असुन सर्वात मोठे आरोग्य शिबीर म्हणुन जागतिक रेकॉर्ड अशी विक्रमाची नोंद घेण्यात आली आहे. इंटरनॅशनल रेकॉर्ड ऑफ एक्सलेंस हा किताब या महाआरोग्य शिबिराला मिळाला आहे जो की महाराष्ट्र व सरकारसाठी अभिमानास्पद आहे. डॉ सावंत हे वारकरी यांच्यासाठी देवदूत ठरले आहेत.
आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतुन व पुढाकारातून पंढरपूर येथे महाआरोग्य शिबीर घेण्यात आले यात 15 लाख 12 हजार 774 वारकरी यांची तपासणी करण्यात आली, यात 7 हजार 500 पेक्षा जास्त डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला. महाआरोग्य शिबीर यशस्वी करुन एक नवीन जागतिक रेकॉर्ड केल्याबद्दल आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत, प्रा शिवाजीराव सावंत, डॉ धर्मेंद्र पवार, डॉ दिलीप पवार यांचा सन्मान पत्र देऊन करण्यात आला आहे.
वारी ही महाराष्ट्राची ओळख व संस्कृतीक, संत परंपरा… आषाढीवारी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखों भाविक हे पंढरपुरला विविध दिंडीतुन पायी चालत येतात. पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्याच्या अनेक अडचणी येतात, विविध घटनात 120 वारकऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला मात्र त्यांना वेळीच योग्य उपचार मिळाल्याने त्यांचे जीव वाचले. हार्ट अटॅकसह इतर गंभीर प्रकारात 1 हजार 270 रुग्णांवर तात्काळ उपचार केले गेले. मंत्री डॉ सावंत हे ‘देवदुत’ ठरले असुन त्यांच्या रूपाने पांडुरंग धावुन आला.
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी या अभियानाचे 2 रे वर्ष आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून याची सुरुवात आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी केली. थंडी, ताप, खोकला, पोटदुखी, सारी, रस्ते अपघात, कुत्रा व साप चावणे आदी घटनात वारकऱ्यांवर उपचार करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून सहाशे पेक्षा अधिक दिंड्यासोबत एक रुग्णवाहिका व एक फिरता दवाखाना सोबत ठेवण्यात आला. ब्लड प्रेशर तपासणी, शुगर तपासणी, महिलांसाठी गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी अश्या जवळपास शंभर तपासण्या करण्यात आल्या, त्या रिपोर्टनुसार शासकीय रुग्णालयात गरजेनुसार उपचार केले जात आहेत.