नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी – आमदार कैलास घाडगे पाटील
उस्मानाबाद – समय सारथी
भाजप सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे,सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांचे हित बघणार असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर जेव्हा प्रत्यक्षात मदत देण्याची वेळ आली तेव्हा मात्र हात आकडता घेतल्याचे दुर्देवी असल्याचे मत आमदार कैलास घाडगे पाटील यानी व्यक्त केले आहे. 2019 रोजी अशाच प्रकारे नुकसान झालेल्या कोल्हापुर सांगली जिल्ह्यात निकष बाजुला ठेवुन मदत करण्यात आली पण आता त्याच भाजप सरकारने असा दुजाभाव करुन शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचेही आमदार घाडगे पाटील यानी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कोल्हापुर व सांगली जिल्ह्यामध्ये अशाचप्रकारची अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ नुकसान झाले होते. त्यावेळी त्यानी शेतकऱ्यांचा सहानभुती पुर्वक विचार करुन कोरडवाहु पिकांना 20 हजार 400 रुपये, सिंचनाखालील पिकास 40 हजार 500 रुपये व बहुवार्षिक पिकास 54 हजार रुपयाची मदत देऊ केली होती.मग आता शेतकऱ्याविषयी या सरकारची सहानभुती कमी झाली का असा प्रश्न आमदार पाटील यानी विचारला आहे.विरोधी पक्षात असताना एक भुमिका व सत्तेत आल्यानंतर त्याच भुमिकेला छेद देण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्देवी असल्याचे त्यानी म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान, त्यांचा झालेला उत्पादन खर्च याचा मदत देताना कसलाही विचार केलेला दिसत नाही. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिक गांभीर्याने काम करणार असल्याचे सांगण्यात आले होते, शिवाय आत्महत्या कमी करण्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार असेही जाहीर केले होते.जेव्हा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती त्यावेळी तुटपुंजी मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांप्रती दुजाभाव केल्याची भावना आमदार घाडगे पाटील यानी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन वर्षापासुन नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पिकविमा कंपनीकडुन मदत देण्यास टाळाटाळ केलेली आहे, त्यामुळे दोन वर्षाचे घेतलेले पिक कर्ज व चालु हंगामासाठी काढलेले कर्ज माफ होणे गरजेचे आहे.कोल्हापुर व सांगली भागामध्ये मदत देताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले होते.मग आता या शेतकऱ्यांचे कर्ज माफ कऱण्यात सत्ताधारी मंडळीना विसर का पडला असा सवाल आमदार घाडगे पाटील यानी विचारला आहे. शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे फक्त बोलुन दाखवु नका, तर प्रत्यक्षात मदतीचा हात देऊन कृती करा असेही आवाहन आमदार पाटील यानी केले आहे.