धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड, कारवाईला सुरुवात
उस्मानाबाद – समय सारथी
चोराखळी येथील धाराशिव शुगर कारखान्यावर आयकर विभागाची धाड पडली असून आज पहाटे पासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई सुरु आहे.ही कारवाई आगामी काही दिवस सुरु राहील अशी माहिती आहे.
अभिजीत पाटील चेअरमन असलेल्या कारखान्यावर धाडी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील असून ते साखर सम्राट म्हणून गेल्या 10 वर्षात ओळखले जात आहेत. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत 21 पैकी 20 जागा जिंकल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते.विठ्ठल सहकारी व धाराशिव कारखाना चेअरमन आहेत.त्यांच्या ताब्यात 5 कारखाने आहेत त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, नाशिक व नांदेड येथे एक, धाराशिव असे साखर कारखाने आहेत.
वाळू माफिया ते साखर सम्राट असा अभिजीत पाटील यांचा प्रवास आहे, त्यांना तत्कालीन सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कारवाईनंतर वाळू तस्करी प्रकरणात जवळपास 3 महिने जेलवारी पण झाली होती त्यानंतर त्यांनी बाहेर आल्यावर ट्रॅक बदलला व साखर कारखानदारी सुरु केली.
कृषी अभ्यास शिबिराचे बोर्ड गाडीवर लावून आयकर विभागाची धाड
कृषी अभ्यास शिबीर 24 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट असा बोर्ड लावून आयकर विभागाची गाडी धाराशिव साखर कारखाना येथे धाड टाकण्यासाठी आली आहे, या गाडीवर लागलेल्या बोर्डनुसार 30 ऑगस्ट पर्यंत हा आयकर विभागाचा अभ्यास दौरा सुरु राहणार आहे.
5 गाड्यात जवळपास 20 च्या वर अधिकारी हे अभिजीत पाटील यांच्या विविध संस्थाची चौकशी करीत आहेत यात पुणे व दिल्ली येथील काही अधिकारी यांचा समावेश आहे. जालना येथे आयकर विभागाचे अधिकारी यांनी राहुल वेड्स अंजली असे स्टिकर गाडीला लावून धाड टाकण्यासाठी आले होते आता उस्मानाबाद येथे कृषी अभ्यास शिबिराचा फंडा वापरला असल्याचे दिसते.
24 ठिकाणी महाराष्ट्रात आयकर विभाग कारवाई करत आहे त्यापैकी एक अभिजीत पाटील यांच्याशी निगडित असलेल्या साखर कारखान्यावर धाडी पडल्या आहेत. 48 वाहने 50 पेक्षा अधिक आयकर विभागाचे कर्मचारी आणि महाराष्ट्र पोलिस दलातील शंभरपेक्षा अधिक पोलिसांच्या संरक्षणात हे 24 ठिकाणी तपासणी होत आहे.