धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील दारू उत्पादन करणाऱ्या ऍडलर्स कंपनीला महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दणका दिला आहे. ऍडलर्स कंपनीमुळे या भागात प्रदूषण होत असल्याचा चौकशी अहवाल लातूर कार्यालयाने दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागीय अधिकारी मनीष होळकर यांनी या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कंपनी जाणीवपूर्वक प्रदूषण करीत असल्याचा ठपका ठेवला असुन कंपनीची परवानगी रद्द करुन ती बंद का करण्यात येऊ नये ? कंपनीचा वीज व पाणीपुरवठा का खंडित करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावली आहे. दरम्यान कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेली 5 सदस्य समिती 1-2 दिवसात या कंपनीची व आसपासच्या गावातील पाण्याची स्तिथीची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
काळ्या पाण्याची शिक्षा, गौरगाव विस्थापित होण्याची वेळ – दुषीत पाण्याने आरोग्य धोक्यात, कारखान्याकडुन नियम धाब्यावर या मथळ्याखाली दैनिक समय सारथी वृत्तपत्राने बातमी प्रसिद्ध केली होती. गौरगाव येथील शाम कापसे व अक्षय वाघ या दोघांनी पाणी व हवा प्रदूषण होत असल्याची लेखी तक्रार दिली होती त्यानंतर ऍडलर्स कंपनीच्या दुषित पाणी व इतर तक्रारीबाबत चौकशी करण्यासाठी लातूर येथील पथक आले होते त्या पथकाने पाहणी करुन पंचनामा केला होता त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. कंपनीने ड्रायर सेक्शन मधील इस्ट स्लज सोबत पावसाचे पाणी मिक्स होऊन बंधाऱ्यात गेले, नैसर्गिक नाल्यात काळे पाणी झाले असुन ते पाझर तलावात जात आहे. या पाण्याला विशिष्ट प्रकारचा वास होता असे नमूद केले आहे. लातूर पथकाने कारखाना व जवळील भागातील 6 ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
ऍडलर्स कंपनीच्या प्रदूषण विरोधातील तक्रारीबाबत अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी 5 जणांची चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. कळंब उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत कळंब तहसीलदार, पोलिस निरीक्षक, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व संभाजीनगर येथील प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती येत्या 1-2 दिवसात प्रत्यक्ष पाहणी करुन त्याचा अहवाल देणार आहे. आमदार कैलास पाटील यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घातले असुन गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल पाठपुरावा सुरु केला आहे.
ऍडलर्स कंपनीतून निघणाऱ्या खराब पाण्यामुळे गौरगाव ग्रामस्थांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. कंपनीने पाणी उपाययोजना न करता सोडल्याने गावातील पाणीपुरवठ्याला दूषित पाणी येत आहे तर आसपासची जमीन नापिक झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. शिवाय या कंपनीमुळे वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे.
राजकीय वरदहस्त, पुर्तता न करता दिली परवानगी, चौकशीची मागणी
छत्रपती संभाजीनगर विभागीय अधिकारी मनीष होळकर यांनी कंपनीला त्रुटी पुर्ण करण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत पूर्तता न केल्यास परवानगी रद्द करण्याची व पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. प्रदूषण मंडळाच्या चौकशी अहवाल व नोटीसमुळे ऍडलर्स कंपनी प्रदूषण करीत असल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले आहे. या कंपनीला एका राजकीय पक्षाचा वरदहस्त असुन त्यामुळे अनेक त्रुटी व बाबीकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप होत आहे. कंपनीला परवानगी देतेवेळी काही बाबी व उपाययोजना करणे गरजेचे होते मात्र त्याची पूर्तता नसताना परवानगी देण्यात आली त्यामुळे त्याची चौकशीची मागणी होत आहे. प्रदूषणच्या विरोधात व इतर बाबी विरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.