लाचखोर तहसीलदार राहुल पाटील सोलापूर रुग्णालयात दाखल
लाचलुचपत विभागाच्या कारवाईने महसूल प्रशासनाचा बीपी वाढला
उस्मानाबाद – समय सारथी
उमरगा येथील तहसीलदार राहुल पाटील यांना वाळू गाडीसाठी 20 हजाराची लाच घेताना उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केल्यानंतर त्यांचा बीपी वाढल्याने त्यांना प्रथम उमरगा, त्यानंतर उस्मानाबाद व नंतर सोलापूर येथे रेफर करण्यात आले आहे. पाटील हे सोलापूर येथे वैद्यकीय उपचार घेत असल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे. लाचलुचपत विभागाच्या कारवाईत महसूल प्रशासनातील 2 मोठे मासे अडकल्याने महसूलचा बीपी काही काळापुरता का होईना चांगलाच वाढला आहे.
तक्रारदार यांना त्यांच्या शेतामध्ये घराचे बांधकाम करायचे असल्याने त्यांना चार ट्रक वाळूची आवश्यकता होती म्हणून तक्रारदार हे पंचांसह लोकसेवक असेल्या तहसीलदार राहुल पाटील यांची भेट घेण्यासाठी त्यांचे शासकीय निवासस्थानी जाऊन याबाबत त्यांना बोलले असता लोकसेवक यांनी मध्यस्थी मार्फत चार ट्रक वाळू घेण्यासाठी व त्या वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांना एका ट्रकला 5 हजार रुपये प्रमाणे चार ट्रक वाळूसाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले व 20 हजार लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली.
प्रशासकीय अपयश, आता तरी सुधारणा होणे अपेक्षित
पाटील अडकल्यानंतर त्याची दिवसभर चर्चा रंगली,भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांना 1 लाखांची लाच घेताना अटक केल्यानंतर महसूल विभागात शिस्त लागणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे स्वच्छ प्रतिमेचे असले तरी त्यांचे महसूल प्रशासनावर नियंत्रण व वचक नसल्याने लाचखोरी वाढली हे त्यांचे प्रशासकीय अपयशच म्हणावे लागेल.भ्रष्टाचार रोखण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी सध्या रामबाण उपाय शोधला आहे.भ्रष्टाचार नको किंवा काही बाबीत आरोप नको म्हणून काही फाईलवर सह्याच करायच्या नाहीत हे धोरण सध्या सुरु आहे, याचा फटका नागरिकांना बसत आहे त्यामुळे प्रशासकीय कामाचे ऑडिट गरजेचे आहे. आता तरी प्रशासनात सुधारणा व कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.