विठ्ठल भोवला नाही तर पावला – विरोधकांनी आता माझे आव्हान पेलून दाखवावे
आयकर विभागाची कारवाई संपल्यावर अभिजीत पाटील यांचा इशारा
उस्मानाबाद – समय सारथी
अल्पावधीत साखरसम्राट अशी ओळख झालेल्या धाराशिव साखर कारखान्याचे तथा डी व्ही पी ग्रुपचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या कार्यालयव कारखान्यावरील आयकर विभागाची कारवाई संपली आहे.
आयकर विभागाला चुकीची माहिती दिली गेली, की कारखाने कुठून एका मागून एक आले इतका पैसा कुठून आला त्यावर आम्ही सांगितले की काही कारखाने हे कर्ज घेऊन भाडेतत्वावर घेतले आहेत त्यामुळे त्याला भांडवलाची गरज नाही. जे काही होते ते सगळे रेकॉर्डवर होते. धाडीत कुठेही अवैध पैसा, सोने किंवा इतर मालमत्ता सापडली नाही त्यांना दिलेल्या माहितीमुळे आयकर विभागाच्या अधिकारी यांचे समाधान झाले. त्यांनी मागणी केल्या प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली व काही कागदासाठी 15 दिवसांचा अवधी दिला आहे त्यात ती दिली जातील.
मी गेल्या 2 महिन्याखाली पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखान्याची निवडणूक लढाविली त्यात मला यश आले त्यामुळे माझा वारू रोखला पाहिजे यासाठी विरोधकांनी षडयंत्र रचले. असा आरोप केला.
विठ्ठल कारखाना माझ्याकडे शेतकरी सभासदांनी दिला त्यानंतर आयकर विभागाच्या कारवाईत काही न सापडल्याने मी उजळ माथ्याने फिरू शकतो त्यामुळे मला विठ्ठल या कारवाईने कोपला नाही तर विठ्ठल पुन्हा एकदा पावला अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. मी जे काही केले कामाविले ते प्रामाणिकपणे केले.
राजकीय विरोधातून हे सगळे केले गेले, विरोधकांना जसाच तसे उत्तर दिले जाईल, विरोधकांचे नाव सगळ्यांना माहित आहे ते योग्य वेळी जाहीर करू, जे झाले आहे ते चांगले झाले त्यामुळे येणाऱ्या काळात मी चौपाट ताकतीने काम करेल व या भागातील लोकांना रोजगार, उसाचा प्रश्न मार्गी लावेल व या कारवाईतून मला बळ मिळाले आहे. विरोधकांनी जे आव्हान दिले होते ते मी पेलले आहे, त्यांना यातून काही शक्य झाले नाही. आता विरोधकांनी माझे आव्हान पेलून दाखवावे, त्यांच्या काही गोष्टी आता बाजारात येतील असा इशारा पाटील यांनी विरोधकांना दिला.
विठ्ठल कारखाना जिंकल्यावर खऱ्या अर्थाने काही जणांना माझी भीती वाटू लागली. बहुजन मराठा समाजाची मुले अशी प्रगती करताना मैदानात अडवता येत नसतील तर अश्या प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचे असल्याचे पाटील म्हणाले.