पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते भुमीपुजन व लोकार्पण
परंडा – समय सारथी
संकल्प मतदारसंघाच्या समग्र विकासाचा, निर्धार सर्वसामान्यांच्या उत्कर्षाचा असा संकल्प करीत पालकमंत्री डॉ सावंत यांनी भरगोस विकास निधी आणला आहे, त्यातील विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. परांडा तालुक्यातील जाकेपिंपरी, टाकळी, राजुरी, अंदोरा , खासापूरी नं २, खासापूरी नं १, व चव्हाणवाडी येथील गावांना भेट देऊन केलेल्या विकास कामाचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत व त्या गावातील ग्रामस्थांच्या उपस्थित लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने गावाला जोडणारे प्रमुख रस्ते, जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, सांस्कृतिक सभागृह बांधकाम, गावांतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणे यांसारख्या मूलभूत सुविधा विकासकामांचा समावेश आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रा. गौतम लटके, शिवसेना नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, रामचंद्र घोगरे, जयदेव बप्पा गोफणे, बालाजी नेटके, गुलाब शिंदे आदिसह शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाडव्यापर्यंत पाणी सीना कोळेगाव धरणात येणार
भूम परांडा वाशी साठी अतिशय जिव्हाळ्याचा असणारा विषय म्हणजे आपल्या हक्काचे पाणी…आपल्या सततच्या प्रयत्नांतून सुरू असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेअंतर्गत, उजनीचे पाणी सीना कोळेगाव प्रकल्पात आणण्यासाठी बोगद्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही तातडीने पूर्ण करून साधारपणे पाडव्यापर्यंत हे पाणी सीना कोळेगाव धरणात येईल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री डॉ सावंत यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिला.