रोखठोक – माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणार असाल तर संवाद साधू नका
मी काय अंगठा छाप मंत्री आहे का ? पुरावा द्या, राजीनामा देतो- मंत्री डॉ तानाजीराव सावंत
उस्मानाबाद – समय सारथी
हापकीन माणसापासून औषधे घेणे बंद करा असे मंत्री सावंत बोलल्याचे काही प्रसार माध्यमानी सांगत त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले होते यावर रोखठोक बोलताना सावंत यांनी काही प्रसार माध्यमाची चांगलीच कानउघडणी केली व त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. मी तसे बोललोच नाही, हे सरकार आलेले काही माध्यमाना रुचेना झाले आहे अशी टीका त्यांनी केली. मी ही दांडकी 11 वी 12 वीचा पोरगा म्हणून घेऊन हिंडत नाही असे ते म्हणाले. हापकीन माणूस असे मी म्हणालो असेल तर पुरावा द्या मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देतो असे सांगत त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना फैलावर घेत झापले. डॉ सावंत यांच्या या भूमिकेची चर्चा होत असुन त्याला पाठिंबा मिळत आहे.
मी काय अंगठे छाप मंत्री आहे काय ? मला काही कळतच नाही का ? मी इतका वेडा आहे का ? मी इंजिनियर असुन पीएचडी केली असुन आतापर्यंत मेरिटमध्ये आलेला मी विद्यार्थी आहे तसेच मी अनेक शैक्षणिक संस्था व साखर कारखाने चालवतो. जवळपास 250 पेक्षा जास्त पीएचडी करणारे अनेकजण संस्थात काम करतात. हापकीन काय आहे हे मला माहित आहे. 6-6 महिने त्यांनी रुग्णालयाला औषधे पुरवठा केली नाहीत तरी आम्हाला कोणी काढू शकत नाही असा त्यांचा गैरसमज झाला आहे त्यामुळे विकेंद्रीकरण करुन नवीन कंपनी मार्फत औषध पुरवठा करणे गरजेचे आहे याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली असुन त्यांनी तसे मार्गदर्शन केले आहे.
तुम्ही उत्तरे फिरवू नका आणि त्याचमुळे मी प्रसार माध्यमाना टाळतो असे सावंत म्हणाले. खेकड्यानी धरण फोडले असा त्यावेळी जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. मेरीचा अहवाल होता त्यात त्यांनी काही कारणे सांगितली त्यापैकी ते एक कारण होते मात्र जाणीवपूर्वक विपर्यास केला गेला.
इथून पुढे मी जे बोललो तेच दाखवणार असाल तर मी बोलणार, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणार असाल तर मी विनंती करतो की माझ्याशी प्रसार माध्यमानी संवाद साधू नका. मी थेट जनतेशी संवाद साधेल, मी काय आहे हे जनतेला माहित आहे.
आमची सत्ता आली हे काही विरोधक व काही माध्यमाना रुचेना झाले आहे, सत्तातर झाले आहे हे मानायला काहीजण अजून तयार नाहीत. जनतेने जो कौल दिला होता त्याच्या अधीन राहून आम्ही हे सत्तातर केले आहे, जनतेच्या मनातला उठाव केला आहे. भाजपला किंवा एकट्या शिंदे यांना किंवा आम्हा 40-50 आमदारांना वाटते म्हणून हे केले नाही. जनतेचा आक्रोश होता त्याला न्याय देण्याचे काम आम्ही केले आहे. काही प्रसार माध्यमाना हे रुचत नसेल तर त्यांना याचा लखलाभ आमच्याशी संवाद साधू नका, आम्ही काही चुकीचं केले असेल तर जनता निवडणुकीत धडा शिकवेल किंवा न्याय देईल असे सावंत म्हणाले.