तुळजापूर शहर प्रवेश कर घोटाळा – ठेकेदार राम छत्रेसह साथीदारांवर गुन्हा नोंद
आदेश दिल्यानंतर तब्बल 4 वर्षांनी गुन्हा नोंद – 30 फेब्रुवारीचे करारपत्र
उस्मानाबाद – समय सारथी – प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडून तुळजापूर शहर प्रवेश कराच्या नावाखाली करोडो रुपयांची लूट करणाऱ्या ठेकेदार सीताराम उर्फ राम विलास छत्रे याच्यासह त्याच्या साथीदारांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या चौकशी अहवालानंतर तब्बल 4 वर्षांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे . ठेकेदार राम छत्रे व त्याचे साथीदार हे यात आरोपी असून त्यांच्यावर 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यानंतर 4 वर्षानंतर गुन्हा नोंद झाला असून या घोटाळ्यात एक करारपत्र असून यात तुळजापूर येथील अनेकजण अडकले आहेत त्यामुळे सखोल चौकशीची गरजेची आहे. प्रसार माध्यमातून आवाज उठवल्यानंतर तुळजापूर येथील राजाभाऊ माने यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर नगर परीषद प्रशासनाने तक्रार देत गुन्हा नोंद केला आहे.
महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात प्रवेश करण्या साठी कसलाही प्रवेश कर नाही मात्र आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापुरात मात्र शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक चारचाकी वाहनांकडून ४० व ५० रुपये सर्रास लुटले जात होते . प्रवेश कराच्या नावाखाली हा अजब रझाकारी पद्धतीचा कर भाविकांच्याकडून तुळजापूर शहरातील प्रत्येक चौकात व प्रवेश करण्याच्या ठिकाणी गुंडगिरीचा वापर करून बळजबरीने वसूल केला जात होता याचा प्रत्यक्ष अनुभव स्वतः तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांना सुद्धा आला होता.
आई भवानीच्या दारात सुरु असलेले हे खुलेआम लुटीचे प्रवेश कर घोटाळ्याचे प्रकरण पत्रकारांनी उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मीट द प्रेस या कार्यक्रमात वाहन वसुली पावतीच्या पुराव्यासह जिल्हाधिकारी समोर मांडले होते त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी उस्मानाबादचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ चेतन गिरासे यांना सविस्तर चौकशीचे आदेश दिले होते . गिरासे यांनी केलेल्या चौकशीअंती ठेकेदार छत्रेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तुळजापूर मुख्याधिकारी यांना दिले होते मात्र गेली 4 वर्ष गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.
तुळजापूर येथील पार्किंग (वाहन तळ) येथे वाहन उभे केल्यास पार्किंग कर घेण्याचा ठेका तुळजापूर नगर परिषदेने ठेकेदार राम छत्रे याला लिलावाद्वारे दिला होता मात्र वाहन फी वसुलीची पावती बुके तुळजापूर मुख्याधिकारी यांच्याकडून यांच्याकडून प्रमाणित न करता वसुली केली जात होती त्यामुळे ठेकेदारांचा आर्थिक गैरव्यवहाराचा मानस दिसून येत असल्याचे आदेशात नमूद केले होते आजवर वाहन कराच्या फाडलेल्या सर्व पावत्या वाहन मालकाकडे दिल्याने व पावत्या चौकशी समितीसमोर उपलब्ध न झाल्याने पावत्यावर वाहन क्रमांक व वाहनाचा प्रकार दर्शविला नाही.तुळजापूर शहरातील शिवाजी चौक , डॉ आंबेडकर पुतळा , मलबा रुग्णालय , बस स्थानक व इतर ठिकाणी हि प्रवेश कर वसुलीचे मोठ मोठाले बोर्ड लावले होते या गोष्टी पंचनामा व चौकशी अहवालात आढळल्या होत्या त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद हे करीत आहेत .
तुळजापूर शहरात येणाऱ्या भाविकांची वाहने वाहन तळ ( पार्किंग ) येथे आल्यावर कर वसुली करण्यासाठी वाहनतळ ३ वर्षासाठी ठेक्याने देण्याचा ठराव १० नोव्हेंबर २०१४ रोजी तुळजापूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला . या ठरावाला नारायण विठ्ठल गवळी व गणेश किसन कदम यांनी अनुमोदन दिले व त्यानंतर लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली . १ लाख रुपयांची अनामत रक्कम भरून हा ठेका तुळजापूर शहरातील सीताराम विलास छत्रे याला २ कोटी ४० लाख रुपयेसाठी १ फेब्रुवारी २०१५ ते ३१ जानेवारी २०१८ या ३ वर्षाच्या कालावधीसाठी देण्यात आला.
अटीनुसार वाहनतळ येथे सहाचाकी वाहन पार्किंग केल्यास ६० रुपये , चारचाकी वाहनास ४० तर दुचाकी वाहनास प्रत्येकी १० रुपये इतका २४ तासासाठी कर वसूल करण्याचे नियम होते मात्र ठेकरदार छत्रे व नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी राजीव शंकर बुबणे यांनी संगनमत करून करारनामा करताना मूळ अटी व शर्थी बदलून वेगळाच करार केला. शहरात वाहन तळ येथे थांबणाऱ्या वाहनांकडून कर घेण्याची मूळ अट असताना करार करताना मात्र शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनास कर घेण्याचा अधिकार ठेकेदार याला राहील असे बॉण्डवर लिहले आणि इथूनच तुळजापूर शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांकडून प्रवेश कर वसूल करण्याची रझाकारी पद्धत सुरू झाली ..
३० फेब्रुवारीचे भागीदारी करारपत्र – २ फेब्रुवारीच्या करारनाम्यात ३० फेब्रुवारीचा उल्लेख
ठेकेदार राम छत्रे व त्याच्या साथीदार पुढाऱ्यांनी आपआपसात ३० फेब्रुवारी २०१५ रोजी भागीदारी करारपत्र केल्याचा उल्लेख नगर परिषदे सोबत केलेल्या २ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या मुख्य करारनाम् यात केला आहे . विशेष म्हणजे ३० फेब्रुवारी ही तारीखच मुळात अस्तित्वात नसते असे असतानाही त्याचा उल्लेख केला गेला आहे. तुळजापूर शहरातील सीताराम उर्फ राम विलास छत्रे याला वाहन तळाचा ठेका २ कोटी ४० लाख रुपयाला २८ जानेवारी २०१५ रोजी मिळाला. राम छत्रे याला कागदोपत्री ठेका मिळाल्यानंतर तुळजापुरातील काही नगरसेवक व काही गाव पुढाऱ्यांनी राम छत्रे याच्या सोबत भागीदारी करारपत्र तयार करून घेतले,यात अनेक बडया नेत्यांची नावे आहेत.
राम छत्रे याने नगर परिषदेशी २ वेगवेळ्या दिवशी खरेदी केलेल्या बॉण्डनुसार करारनामा केला . राम याने १ हजार रुपयांचे २ बॉण्ड ३१ जानेवारी २०१५ ला तर ५०० रुपयांचे ४ बॉण्ड २ फेब्रुवारी २०१५ रोजी खरेदी केले व करारनामा केला.२ फेब्रुवारी २०१५ रोजी केलेल्या करारनाम्याची नोटरी तब्बल ४ महिने उशिराने दिनांक ९ जून २०१५ रोजीने करण्यात आली.