प्रशासनाचे पितळ उघडे – आमदार कैलास पाटील यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्याकडून माहिती
जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या कामाबाबत संभ्रम दूर – महाविकास आघाडीला दिलासा
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या एप्रिल 2021 पासूनच्या कामांना स्थगिती दिल्याचे सांगून वार्षिक योजनेतील कामे थांबविण्यात येत होती. गेल्या काही महिन्यापासून प्रशासनाकडून संभ्रम निर्माण करुन दिला जात होता मात्र शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना लेखी पत्र लिहून त्याचे उत्तर घेत प्रशासनाचे पितळ उघडे पाडले आहे. एप्रिल 2021 पासूनच्या कामांना स्थगिती नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी लेखी कळविल्याने याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे त्यामुळे एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामे यामुळे करता येणार आहेत.
स्थागिती परिपत्रकात जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत मंजूर कामांच्या बाबतीत कोणताही उल्लेख दिसून येत नाही तसेच 2021-22 बाबतीत शासनाचे नियोजन विभागाकडून अद्याप पर्यंत कोणतेही निर्देश प्राप्त नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी आमदार पाटील यांना पत्राद्वारे कळविले आहे.
जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण 2022-23 च्या अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना शासनाच्या नियोजन विभागाने स्थगिती दिली आहे मात्र इतर विभागाप्रमाणे एप्रिल 2021 पासूनच्या कामांना स्थगिती दिल्याचे तोंडी सांगून काही कामे थांबाविली जात होती त्यामुळे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे माहिती मागवली होती त्यास उत्तर देताना जिल्हाधिकारी यांनी एप्रिल 2021 पासूनच्या कामांना तशाप्रकारची स्थगितीचा उल्लेख आदेशात नसल्याचे सांगितले त्यामुळे आता स्थगिती देता येणार नाही. एप्रिल 2021 पासूनच्या कामानाही स्थगिती असल्याची कारणे देऊन ती थांबाविण्यात आल्याचे काही अधिकारी तोंडी सांगत होते मात्र आता मंजूर कामे सुरु करता येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
1 एप्रिल 2022 पासूनच्या विविध योजनेतील कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यताना स्थगिती देण्यात आली आहे. नवीन पालकमंत्री नियुक्त झाल्यावर त्यांच्या व समितीच्या सूचनेनुसार आढावा घेऊन मान्यता दिली जाणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या पत्रानंतर जिल्हा परिषदेकडून निविदा प्रक्रिया सुरु
जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दिलेल्या निधीतील बहुतांश कामे या संभ्रमामुळे बंद पडली होती मात्र जिल्हाधिकारी यांच्या लेखी पत्रानंतर आता जिल्हा परिषदेने सन 2021 मधील 46 कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया राबवायला सुरुवात केली आहे त्यामुळे आगामी काळात हा निधी खर्च होऊन विकास कामे होणार आहेत. आमदार पाटील यांच्यामुळे हा संभ्रम दूर झाला असून जिल्हाधिकारी यांनी याबाबत जिल्हा परिषदेला कळविले असल्याने मार्ग मोकळा झाला आहे.