धाराशिव – समय सारथी
तत्कालीन मुख्याधिकारी डॉ संतोष रामचंद्र टेंगळे विरोधात उमरगा पोलिस ठाण्यात विनयभंग व ऍट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संतोष टेंगळे यांची धाराशिव जिल्ह्यातील कारकीर्द वादग्रस्त व विविध घोटाळ्याने कायम चर्चेत राहिलेली असतानाच आता त्यांच्यावर धाराशिव पोलिसात एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. गुन्हा नोंद होताच टेंगळे हे फरार झाले आहेत, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख हे याचा तपास करीत आहेत.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या 1 कोटी 62 लाख रुपयांच्या यात्रा अनुदान घोटाळ्यात तत्कालीन मुख्याधिकारी डॉ संतोष रामचंद्र टेंगळे हे मुख्य आरोपी होते. 27 मार्च 2017 ला गुन्हा नोंद झाल्यावर ते तब्बल 13 महिने फरार होते मात्र ते 23 एप्रिल 2018 रोजी स्वतः पोलिसात हजर राहिले. टेंगळे यांची आळंदी, दौंड व इतर ठिकाणची कारकीर्द विविध घोटाळे व गुन्हे नोंद झाल्याने वादग्रस्त ठरली आहे.
संतोष टेंगळे हे मुरूम येथे मुख्याधिकारी म्हणुन कार्यरत असताना त्यांनी एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला व फसवणुक केली. फिर्यादी नुसार पिडीत महिला उमरगा येथे राहत होती, टेंगळे हे या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असे. माझ्याकडे 3 नगर परिषदाचा चार्ज आहे, मी एक चांगला अधिकारी असुन माझे तुमच्यावर प्रेम असुन लग्न करू असे सांगितले. 2015 साली अनेक वेळा त्यांनी पिडीत महिलेला कर्नाटक राज्यात नेले व तिथे 2-3 दिवस मुक्काम केला व शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली. पिडीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली.
पिडीत महिलेच्या तक्रारीनंतर उमरगा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असुन अनेक तांत्रिक मुद्दे व तपास बाकी असल्याने आगामी काळात यातील गुन्ह्यांच्या कलमात वाढ होऊ शकते. पोलिस या घटनेचा तपास करीत असुन टेंगळे यांचा शोध सुरु आहे.