उस्मानाबाद शहरातील 2 तरुणांना पिस्टल व धारदार शस्त्रासह बार्शीत अटक, 3 दिवसांची पोलीस कोठडी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरातील 2 तरुणांना बार्शी येथील बस स्थानकावर पिस्टल व धारधार शस्त्रासह अटक करण्यात आली असून 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलीस कॉनस्टेबल अविनाश धिरु पवार यांच्या फिर्यादीवरुन सुजीत बापुराव मुंढे वय 23 वर्षे रा. तांबरी विभाग व मेघराज उर्फ संकेत सतिश बागल वय 21 वर्षे रा माणीक चौक उस्मानाबाद यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून कोर्टाने 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. बार्शी शहर पोलीस ठाणे गु.र.नं.604/2022 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25 सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 तसेच भादवी कलम 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या दोघांकडून 50 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल त्याचे मुठीवर दोन्ही बाजुने काळी पट्टी असलेले व त्यास मँगझीन असलेले ती मँगझीन तपासून पाहिली असता मॅगझीनमध्ये धातुचे दोन राऊंड मिळुन आले असून एक धारधार चाकू सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे. शस्त्र परवाना बाबत माहिती विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी त्यांची कसून चौकशी केली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार अजित वरपे हे तपास करीत आहेत.
या तरुणाकडे अवैध शस्त्र कुठून आले ते याचा वापर कशासाठी करणार होते यासह अन्य बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.