गर्भलिंग तपासणी व निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश – गुलबर्गा येथे जाऊन उस्मानाबाद आरोग्य विभागाची कारवाई
उस्मानाबाद – समय सारथी
गर्भलिंग तपासणी व निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश उस्मानाबाद आरोग्य विभागाने कारवाई करीत केला आहे. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे जाऊन उस्मानाबाद आरोग्य विभागाने ही धाडसी कारवाई केली आहे. जिल्हा दक्षता समितीला गोपनीय माहिती मिळाल्यावर स्ट्रिंग ऑपरेशन करीत ही कारवाई केली. परराज्यात जाऊन रॅकेट उघड करण्याची ही उस्मानाबाद आरोग्य विभागाची गेल्या 28 वर्षातील पहिलीच कारवाई आहे.
प्रा डॉ तानाजीराव सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री झाल्यावर उस्मानाबादसह राज्यातील आरोग्य यंत्रणा दक्ष व सक्रीय झाली असून त्याचाच एक भाग म्हणून ही परराज्यात कारवाई झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्यमंत्री सावंत यांनी आढावा बैठकीत अवैध गर्भलिंग तपासणी मुद्दा हाती घेत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सापळा रचत ही कारवाई केली. बेटी बचाव या मोहिमेला या कारवाईमुळे बळ मिळणार आहे.
गुलबर्गा येथील डॉ गुरुराज कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस धाड पडताच डॉ कुलकर्णीला रांगेहात अटक केली आहे. डॉ कुलकर्णी हा घरात सोनोग्राफी करुन तपासणी करीत होता.उस्मानाबाद आरोग्य विभागाला माहिती मिळताच स्ट्रिंग ऑपेरेशन करीत रॅकेटचा उलघडा केला.उमरगा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विक्रम आळंगीकर व विधी सल्लागार ऍड रेणुका शेटे या दोघांनी गुलबर्गा येथे जाऊन 2 दिवस राहत ही मोहीम यशस्वी केली. परिसेविका सुनंदा गोस्वामी,तंत्रज्ञ पद्माकर घोगे ,स्टाफ नर्स गोकर्णा पांचाळ,शिदोरे यांनी या धाडीत सहभाग घेतला
गर्भलिंग तपासणी करण्यासाठी प्रति रुग्ण 15 हजार रुपये घेत डॉ कुलकर्णी गर्भात मुलगा की मुलगी असल्याचे निदान करीत होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, लोहारा या तालुक्यातील भागात एजन्ट मार्फत डॉ कुलकर्णी रुग्ण शोधायचा हा त्यांची तपासणी करायचा याकरिता तो एजेंटला प्रति महिला 2 हजार कमिशन देत असे, या कारवाईत आळंद येथील एक एजन्ट फरार झाला आहे. हा एजन्ट उमरगा भागात रुग्ण शोधण्याचे काम करीत होता. उस्मानाबाद आरोग्य विभागाला मिळालेल्या ऑनलाईन तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, सचिव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील,विधी सल्लागार ऍड रेणुका शेटे, उमरगा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विक्रम आळंगीकर, सदस्य जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, नोडल ऑफिसर डॉ दत्तात्रय खुणे यांच्यासह इतर सदस्यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने ही कारवाई केली.
कर्नाटक राज्यात पोलीस व आरोग्य विभागाचे सहकार्य मिळण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी मोलाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे मुलगा मुलगी गर्भलिंग तपासणी करणाऱ्या लोकात, डॉक्टर व एजन्टमध्ये खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्नाटक, आंध्र व तेलगणा या सीमावर्ती भागात हे गर्भलिंग तपासणी करणाऱ्याचे रॅकेट सक्रीय असल्याची चर्चा होती मात्र परराज्यात थेट कारवाईची ही पहिलीच वेळ आहे. सीमावर्ती भागात गर्भलिंग तपासणीमुळे मुलगा मुलगी लिंगगुणोत्तर प्रमाण इतर तालुक्याच्या तुलनेत कमी झाले होते.