अरविंद नागरी बँकेत ठेवीदारांची फसवणूक, ठेवीदारांनी तक्रार द्यावी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांचे आवाहन
पतसंस्था कुलूपबंद – 10 वर्षानंतर मिळाला न्याय, चकरा मारून अनेक जण थकले
चेअरमन रोहीत दंडनाईक यांच्यासह संचालकांवर गुन्हा नोंद – आरोपी फरार, पोलीस तपास सुरु
धाराशिव – समय सारथी
ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची फसवणूक केल्या प्रकरणी शहरातील अरविंद नागरी बॅंकेचे तत्कालीन चेअरमन रोहितराज विजयकुमार दंडनाईक यांच्यासह अन्य संचालक यांच्या विरोधात फसवणूकसह अन्य कलमा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 2016 पासुन पतसंस्थेचे धाराशिव येथील नोंदणीकृत कार्यालय कुलूपबंद आहे, फसवणूकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
गुन्हा नोंद होण्याची कुणकुण लागताच चेअरमन रोहितराज दंडनाईक यांच्यासह अन्य संचालक फरार झाले असुन पोलीस त्यांचा तपास करीत आहेत. अरविंद बँकेने ठेवीदार यांची फसवणूक केल्याचे प्रकरण दैनिक समय सारथीने सर्वप्रथम समोर आणले होते त्यानंतर ठेवीदार यांनी समोर येत गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर करीत आहेत.
तीन ठेवीदाराची 10 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कलम 420, 406, 409, 120 ब व महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हीतसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 मधील कलम 3 व 4 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बँका बुडविण्याचा दंडनाईक पॅटर्न यनिमित्ताने समोर आला असुन गेल्या महिन्यात वसंतदादा बँकेने करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद असुन चेअरमन विजयकुमार दंडनाईक यांच्यासह संचालक मंडळ फरार आहे. 18 जणांची जामीन धाराशिव कोर्टाने फेटाळली आहे त्यातील काही जण संभाजी नगर उच्च न्यायालयात गेले आहेत.
अरविंद नागरी पतसंस्थेने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार ढोकी येथील सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग गोविंद वाकुरे यांनी केली आहे. वाकुरे यांना 14 टक्के व्याजाचे आमिष दाखविले होते त्यामुळे त्यांनी 2012 साली अरविंद बँकेत 8 लाख 75 हजार एक वर्षासाठी गुंतविले होते मात्र 2013 साली मुदत संपुन 10 वर्ष झाले तरी वाकुरे यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. तसेच खंडू शंकर बोंदर यांनी 50 हजार तर रमेश छगन ठाकरे यांनी 1 लाख गुंतवणूक करीत मुदत ठेव केली मात्र पैसे वारंवार मागूनही दिले नाहीत.
अरविंद नागरी सहकारी पतसंस्थतेही कोट्यवधी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार ठेवीदार यांनी केली आहे. पतसंस्थेच्या लेखापरिक्षण अहवालात गंभीर बाबी व दोष दिसून आल्याने सहकार विभागाने कलम ८८ नुसार या पतसंस्थेची चौकशी प्रस्तावित केली आहे. सहाय्यक निबंधक डॉ. अंबिलपुरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. पतसंस्था स्थापन झालेल्या तारखेपासून संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत त्यामुळे मोठा घोटाळा उघड होऊ शकतो.
10 वर्षानंतर मिळाला न्याय – चकरा मारून अनेक जण थकले, काहींनी जीव सोडला
अरविंद नागरी बँकेत हजारो ठेवीदारांची फसवणूक झाली असून फसवणूक झालेल्या इतर ठेवीदार यांनी आनंद नगर पोलीस व आर्थिक गुन्हे शाखा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दैनिक समय सारथीशी बोलताना केले आहे. तब्बल 10 वर्ष चकरा मारून देखील दंडनाईक यांनी पैसे दिले नाहीत अखेर कंटाळून वाकुरे, ठाकरे व बोंदर यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे इतर ठेवीदार यांना घेऊन तक्रार दिली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याची तात्काळ दखल घेत गुन्हा नोंद केल्याने वाकुरे यांच्यासह अन्य ठेवीदार यांना तब्बल 10 वर्षानंतर न्याय मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ यांनी ठेवीदार यांना विश्वास दिला. अनेक ठेवीदार चकरा मारून थकले तर त्यातील काहीजण पैसे मिळतील या आशेने वयोवृद्ध झाले तर काहींनी जीव सोडला.
संचालक मंडळावर कारवाईची टांगती तलवार, अनेकजण फरार –
रोहित विजयकुमार दंडनाईक (चेअरमन), व्यवस्थापक सुरेश रामकृष्ण भोरे (व्हाईस चेअरमन) रामराजे रावसाहेब पाटील, प्रशांत विष्णुदास तडवळकर, स्वयंम दीपक अजमेरा, सय्यद रफिक अखिल अहमद, दत्तात्रय श्रीरंग लोकरे, अशोक परसराम देवकते, भारत दत्तात्रय शिंदे, सुरेश काशिनाथ मलकुनाईक, उमेश विठ्ठल सातपुते, सिंधू सुभाष सरवदे, शशिकला उद्धव हालकरे हे जुने संचालक मंडळ आहे तर नवीन संचालक मंडळात बोंदर संजय सायसराव, भीमा शिवराम दंडनाईक, राजन रमेश देशमुख, अण्णासाहेब रंगनाथ पाटील, युसूफ यहाबुद्दीन बागवान,सुशांत अर्जुन लष्करे, भारत दत्तात्रय शिंदे, काशिनाथ हणुमंत भोजने यांचा समावेश आहे.