धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेतील शिवसेना उबाठा गटाचे विजयी उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 32 जणाविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पराभुत उमेदवार अर्चना पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अर्चना पाटील यांनी ओमराजे यांच्या निवडीला आव्हान दिले आहे.लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 व 1951 च्या नुसार ज्येष्ठ विधीज्ञ वसंत दिगंबरराव साळुंके, ऍड भुषण महाडिक यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निवडणुकीत अनेक भ्रष्ट मार्गाचा वापर केल्याचा आरोप केला आहे. पक्ष कार्यकर्ते जगन्नाथ गवळी यांनी पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर केला आहे. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे उमरगा येथे भाषण झाले होते ते भाषण एडिटेड व मॉर्फ केले असल्याचे सांगत मुळ भाषण व एडिटेड भाषण हे स्क्रिप्टसह कोर्टात सादर केले आहे, या भाषणामुळे मुस्लिम समाजात तेढ निर्माण झाला व ते भाषण व्हाट्स अप व इतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केल्याने त्याचा फटका मतदानात झाल्याची भुमिका पाटील यांनी कोर्टात मांडली आहे.
ओमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज भरतानाच्या सभेत तेरणा मेडिकल कॉलेज व ट्रस्ट विषयी आरोप केले ते बिनबुडाचे असल्याचे याचिकेत म्हणटले आहे. तेरणा ट्रस्टने रुग्णावर उपचार केले मात्र त्याचे पैसे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उचलले. धाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजुर असताना डॉ पद्मसिंह पाटील यांनी ते मंत्री असताना तेरणा ट्रस्टच्या नेरुळ येथे नेले व इथल्या लोकांवर एकप्रकारे अन्याय केला असे निंबाळकर म्हणाले. हाच मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेत व सोशल मीडिया आणि भाषणात वापरला त्यामुळे मतदानावर फरक पडला.
मतमोजणी केंद्रात प्रवेश करताना ओमराजे यांनी त्यांचे बॉडीगार्ड नवनाथ घुगे, सुनिल भोसले व आमदार कैलास पाटील यांचे बॉडीगार्ड शारुख सय्यद यांना सोबत नेले व मतमोजणी प्रक्रियेवर दबाव टाकला. जमावबंदी आदेश असतानाही ओमराजे निंबाळकर यांनी विजयी रॅली काढुन कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण केला असे अनेक आरोप याचिकेत केले आहेत.
धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी झाली. शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर हे 3 लाख 29 हजार 846 एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. ओमराजे यांना 7 लाख 48 हजार 752 मते तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांना 4 लाख 18 हजार 906 मते पडली.