नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले राहणार
तुळजापुर – समय सारथी, कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडे तीन शक्तीपीठ पैकी एक पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सव काळात तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी 22 तास खुले राहणार आहे. नवरात्र उत्सवाची तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करणाऱ्यात आली असून 26 सप्टेंबर घटस्थापना ते 5 ऑकटोबर दसरा या काळात काळात मंदिर 22 तास खुले राहणार आहे.
भाविकांची नवरात्र काळात गर्दी पाहता मंदिर संस्थानणे हा निर्णय घेतला आहे. मंदिर रात्री 1 वाजता उघडले जाणार असून ते रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे 22 तास सुरु राहणार आहे. मागील 2 वर्ष कोरोना निर्बंध होते मात्र यंदा पहिल्यांदा सर्व निर्बंध नसल्याने मोठी लाखोंची गर्दी होणार आहे. नवरात्र अनुषंगाने मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन, नगर परिषद, आरोग्य विभाग कामाला लागला असून स्वच्छता, भाविकांचे आरोग्य व सुविधा याला प्राधान्य देण्यात आले आहे.
आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय महोत्सवात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.महोत्सव कालावधीत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 17 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2022 या कालावधीत तुळजाभवानी मंदिर येथे 200 मीटर परिसरात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.तहसिलदार तथा मंदिर संस्थानाच्या व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुरु झाली असून 26 सप्टेंबर रोजी विधिवत पूजा करुन दुपारी 12 वाजता घटस्थापना होणार आहे. 29 सप्टेंबर रोजी देवींची रथ अलंकार पूजा, 30 सप्टेंबर रोजी ललित पंचमी असून मुरली अलंकार पूजा,1 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार पूजा, 2 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार पूजा, 3 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी असून महिषासुर मर्दीनी अलंकार पूजा तर 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असणार आहे.