धाराशिव – समय सारथी
दारू उत्पादन करणाऱ्या कंपनीतून निघणाऱ्या खराब पाण्यामुळे गौरगाव ग्रामस्थांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. कंपनीने पाणी उपाययोजना न करता सोडल्याने गावातील पाणीपुरवठ्याला दूषित पाणी येत आहे तर आसपासची जमीन नापिक झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावकऱ्यांनी याबाबत पर्यावरण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दुषित पाणी पिण्याची शिक्षा मिळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील ग्रामस्थांना ऍडलर्स बायो एनर्जी लिमिटेड या दारू निर्मितीच्या कारखान्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कारखान्यातून बाहेर जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे विस्थापित होण्याची वेळ आली आहे. गौरगावच्या काही अंतरावरच वनक्षेत्रात धान्यापासून दारू निर्मितीचा कारखाना सुरू आहे. या कारखान्याने कारखान्यातून निघणाऱ्या घाण पाण्याची प्रक्रिया करण्याची पर्याप्त उपाययोजना व सोय केलेली नाही परिणामी या गावच्या परिसरात हे पाणी जमिनीत मुरून जमिनीचा पोत खराब होत असल्याने जमीन नापीक झाली आहे.
कारखान्यातील पाणी बाहेर वाहून गेल्याने काही विहिरींना काळ पाणी आले असून गावकऱ्यांना नेहमीच साथीचे आजार बळावत आहेत. आता याच पाण्याला वैतागलेल्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी व पर्यावरण विभागाकडे याच्या तक्रारी केल्या असून आम्हाला या होणाऱ्या दूषित पाण्याचा त्रासापासून वाचवा किंवा गाव विस्थापित करा अशी मागणी केली आहे. दरम्यान या संदर्भात पर्यावरण विभागाच्या प्रशासनाची संपर्क केला असता काही ठिकाणी दोष आढळला असून दोषी असणाऱ्या कंपन्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले तर कंपनी आमचा काही दोष नसुन सगळे नियमानुसार चालु असल्याचा दावा करीत आहे.