धाराशिव – समय सारथी
केंद्र शासनाने खरीप 2023 संदर्भात अचानकपणे 30 एप्रिल 2024 रोजी काढलेल्या परिपत्रकामुळे धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख 19 हजार शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहेत हे परिपत्रक रद्द व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु झाले आहे, अनिल जगताप यांच्या नेतृत्वात शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र झाले असुन सरकार विरोधी घोषणाबाजी करीत रोष व्यक्त केला जात आहे.
केवायसी प्रक्रिया सुलभ करुन अनुदान वाटप करावे,सांजा येथील देवस्थान जमिनीवर खंड भरणेबाबत मंत्रालयात दाखल प्रकरणात तात्काळ सुनावणी घेणे, दुष्काळाचे व सततच्या पावसाचे अनुदान लवकर द्यावे, खरीप 2023 चे परिपत्रक रद्द करावे व जुन्या नियमानुसार पीक विमा द्यावा. कांदा व दुध अनुदान, प्रोत्साहन अनुदान, दुष्काळाचे अनुदान, सततच्या पावसाचे अनुदान, तुषार सिंचन अनुदान तातडीने देण्यात यावे या प्रमुख मागण्यासाठी शेतकरी एकवटले आहेत. या धरणे आंदोलनाला खासदार, आमदार यांच्यासह जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतीनी पाठिंबा दिला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी दिली.
खासदार ओमराजे निंबाळकर ,आमदार कैलास दादा पाटील ,माजी आमदार राहुल मोटे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सरचिटणीस प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्याच्या अध्यक्ष सक्षणाताई सलगर ,राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरचिटणीस आदित्य गोरे ,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळजापूरचे नेते अशोक जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस लोहारा तालुकाध्यक्ष नाना पाटील शिवसेना उबाठा गटाचे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल बिराजदार तसेच जिल्ह्यातील विविध 51 ग्रामपंचायतीने या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
26 जून 23 च्या परिपत्रकानुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये मिळणार आहेत मात्र केंद्राच्या नव्या परिपत्रकामुळे केवळ एक हजार रुपये मिळतील 1 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र कमी असलेला शेतकऱ्यांना तर काहीच मिळणार नाही म्हणून हे परिपत्रक रद्द व्हावे यासाठी अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली 26 जुलै रोजी 12 ते 4 या वेळेत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे, या परिपत्रकामुळे धाराशिव जिल्ह्याचे 900 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे असे अनिल जगताप यांनी सांगितले.