धाराशिव – समय सारथी
भुसंपादीत वडगाव एमआयडीसीचा मावेजा न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाला असुन वडगाव येथील शेतकरी अण्णा व्यंकट पाटील यांनी 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. पाटील यांनी तसे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले असुन त्यात व्यथा मांडली आहे.
धाराशिव तालुक्यातील वडगांव (सि.) येथील 7 वेगवेगळ्या गटातील जमीन 2019 मध्ये वडगाव एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आलेली आहे, त्याचा मावेजा अद्याप मिळालेला नाही. अण्णा पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सद्यस्थिती एमआयडीसी यांच्या नावे आहे त्यामुळे शेतकरी पिक आणि पिकविम्याच्या मोबदल्यापासून वंचित राहत आहेत. यापुर्वी पाटील यांनी 1 जुलै रोजी निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला होता परंतु जिल्हा प्रशासनाने 15 दिवस थांबण्याचे तोंडी आश्वासन दिले त्यामुळे ते मागे घेतले मात्र 25 दिवसांचा कालावधी होवून सुध्दा अद्याप कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा लेखी स्वरुपात पत्रव्यवहार केलेला नाही. 31 जुलैपर्यंत मावेजा न मिळाल्यास 1 ऑगस्ट रोजी वडगांव एमआयडीसी येथील नामफलकास गळफास घेवून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
वडगाव एमआयडीसीसाठी 356 एकर जमीन संपादित केली असुन त्याची नोंद सात बारा उताऱ्यावर घेण्यात आलेली आहे. 356 पैकी 89 हेक्टर जमिनीचा भुसंपादन मावेजा शेतकऱ्यांना वाटप केलेला आहे उर्वरित 72 हेक्टर क्षेत्राचा मावेजा देण्यात आलेला नाही. धाराशिव येथील उपविभागीय कार्यालयाने मावेजा रक्कम ठरवून निधी मागणीचा प्रस्ताव प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाकडे दिलेला आहे मात्र तो निधी एमआयडीसीकडुन मिळालेला नाही. पाटील व इतर 22 शेतकरी यांना मावेजा मिळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न व पत्रव्यवहार सुरु आहे.