महावितरण व जिल्हा परिषद कामांना स्थगिती ? पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या निशाण्यावर खासदार ओमराजे
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील महावितरण व जिल्हा परिषद कामांना स्थगिती द्यावी अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार तात्काळ कारवाई करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. पालकमंत्री सावंत यांच्या निशाण्यावर खासदार ओमराजे गट असल्याचे यातून दिसून येते. यापूर्वी पालकमंत्री सावंत यांनी हिंदूगर्वगर्जना अभियानात खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव घेत गुत्तेदारी व अधिकारी यांच्याकडून हप्ते घेत असल्याचा आरोप केला होता.
उस्मानाबाद जिल्ह्यातील महावितरण विभागातील अनेक कामात अनियमितता झालेली असून स्थानिक जनतेत असंतोष निर्माण झालेला आहे त्यामध्ये अनेक कामे विना निविदा करण्यात आलेली आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत येणारी 3054, 5054 व इतर कामामध्ये बऱ्याच प्रमाणात अनियमितता झालेली आहे त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व जनतेच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून मंजूर करण्यात आलेल्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी. महावितरण व जिल्हा परिषद या विभागातील सन 2021-22 या आर्थिक वर्षातील मंजूर कामांना अंतरीम स्थगिती द्यावी अशी मागणी आरोग्य मंत्री सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यानुसार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा संदर्भ देत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना पत्र दिले आहे त्यामुळे चौकशी होणार का हे पहावे लागेल.
खासदार ओमराजे यांच्यावर जाहीर भाषणात टीका –
मंत्री सावंत यांनी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली. गुत्तेदारी काका मामा यांना द्यायची हे सगळे हद्दपार करणार असून सर्व विकास कामे ही देताना शिवसैनिकाला केंद्रस्थानी ठेवून देणार आहे. माया कामाविण्याची ही इतकी स्वार्थी भोगवादी वृत्ती का ? माझं चुकल, मी 2024 ची वाट पाहतो आहे या त्यांना त्यांची जागा दाखवून देतो. एकदा संधी दिली की ओमराजे यांनी तेरणा कारखाना मोडून खाल्ला त्यांना भंगार सुद्धा खायला पुरले नाही मग तुमचे दायित्व काय ? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. हे शासकीय अधिकारी याच्याकडून हप्ते गोळा करतात ही वृत्ती नको, हे बंद करायचा आहे, हे ठेचून काढू असे सावंत म्हणाले. नेत्यांनी स्वतः गुत्तेदारी, भ्रष्टाचार केल्याने कार्यकर्त्यांचा विकास झाला नाही.जिल्ह्याचे मागासपण जाण्यासाठी त्यांनी काय केले हे सांगावे असे सावंत म्हणाले होते.