धनशक्ती विरुद्ध जनशक्ती , आम्हाला कोणी ऑफर दिली नाही – खासदार ओमराजे निंबाळकर
उस्मानाबाद – समय सारथी
शिवसेना व ठाकरे ही नावे कधीही विभक्त केली जाऊ शकत नाहीत, दसरा मेळावा हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. त्यांनी तुळजाभवानी देवीचे सपत्नीक दर्शन घेतले त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवसैनिक आपापल्या परीने स्वतः जाणार असल्याचे ते म्हणाले.
शिंदे गटाकडून पैशाचा वापर करुन गाडी बुकिंग सुरु आहे करोडो रुपयांचा खर्च केला जात आहे, इथून जरी ते शिंदे गटाच्या गाडीत बसले असतील तरी शिवसैनिकांची पावले तिथे मुंबईत गेल्यावर शिवतीर्थवर वळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाळासाहेब ठाकरे यांना कोणतेही पद घेता आले असते मात्र त्यांनी घरात कोणतीही राजकीय पार्शवभूमी नसलेल्या सामान्य शिवसैनिकाला आमदार, खासदार,मंत्री, मुख्यमंत्री, सभापती केले व अनेक महत्वाची पदे दिली. बाळासाहेब याचे पुत्र उद्धव ठाकरे यांना पदावरून काढणे दुर्दैवी असून ते शिवसैनिक व सामान्य नागरिकांना पटले नाही त्यामुळे ते शिवतीर्थावर उपस्थिती दाखवून त्याचे उत्तर देतील असे ओमराजे म्हणाले. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना सांभाळून घ्या असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते त्याचे तंतोतंत पालन शिवसैनिक करतील.
ऑफर देणाऱ्या माणसाला दिली जाते, आम्हाला कोणी ऑफर दिली नाही असे स्पष्टीकरण खासदार ओमराजे यांनी शिंदे गटाच्या ऑफरवर दिले. माणसाला शेवटी मृत्यूनंतर काहीही घेऊन जाता येत नाही त्याचे कार्य व नाव हे कायम स्मरणात राहते असे त्याप्रमाणे मी व आमदार कैलास पाटील काम करीत आहोत असेही ते म्हणाले.