धाराशिव – समय सारथी
डॉ पाटील व राजेनिंबाळकर हा राजकारणातील वाद तसा राज्याला जुनाच आहे, पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणुन यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा असो की लोकसभा निवडणुक यांच्यात राजकीय सामना व आरोपप्रत्यारोप हे ठरलेलेचं.. धाराशिव लोकसभेत शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा तब्बल 3 लाख 29 हजार मतांनी पराभव केला. निवडणुकीच्या निकालानंतर हा वाद आता छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात गेला आहे, अर्चना पाटील यांनी ओमराजे यांच्या निवडीला आव्हान देत याचिका दाखल केली आहे. ओमराजे यांच्यासह 30 उमेदवार व निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी केले आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 व 1951 च्या नुसार ज्येष्ठ विधीज्ञ वसंत दिगंबरराव साळुंके, ऍड भुषण महाडिक यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. अर्चना पाटील यांनी ओमराजे यांच्यासह 31 उमेदवार याच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय येथे 18 जुलै रोजी दाखल केली असुन ती कोर्टाने 22 जुलै रोजी स्वीकारली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे.
निवडणुक प्रक्रिया राबवीताना अनेक तांत्रिक त्रुटी असणे, ओमराजे निंबाळकर यांनी दबाव आणल्याचा व नियमांचा आणि आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला असुन त्यांच्या भाषणातील काही मुद्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत.
धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी झाली. शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर हे 3 लक्ष 29 हजार 846 एवढ्या मताधिकक्याने विजयी झाले. ओमराजे यांना 7 लाख 48 हजार 752 मते तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांना 4 लाख 18 हजार 906 मते पडली.