धाराशिव – समय सारथी
राज्यभरात सध्या चर्चेत व गाजत असलेल्या आयएएस अधिकारी पुजा खेडकर प्रकरणानंतर खेडकर कुटुंबीयांचे अनेक नवे कारनामे समोर येत आहेत. पुजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक अधिकारी पदावर असताना धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील एका फटाका उद्योजक तरुणाला लाखों रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणात गुन्हा नोंद झाला होता मात्र खेडकर यांना अभय दिल्याचा आरोप तरुणांनी केला आहे त्यामुळे या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास करावा अशी मागणी केली आहे. लाच प्रकरणात क्षेत्रीय अधिकारी अर्जुन राठोडला 60 हजारांची लाच घेताना संभाजीनगर कार्यालयात 26 डिसेंबर 2022 रोजी अटक केली होती.
तेरखेडा येथील अमोल फरताडे या एमबीए झालेल्या तरुणाने शिवछत्रपती फायर वर्क्स या फटाका फॅक्टरीसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रदूषण मंडळाकडे अर्ज दाखल केला होता. नाहरकत देण्याच्या बदल्यात 1 लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली मात्र ती न दिल्याने अर्ज त्रुटी काढून नाकारण्यात आला त्यानंतर पुन्हा अर्ज केल्यावर लाच मागण्यात आली.
प्रादेशिक कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी अर्जुन राठोड यांनी खेडकर यांच्यासाठी 50 हजार व त्याच्या निम्मे म्हणजे 25 हजार रुपये स्वतःला असे 75 हजार रुपये मागितले. या सर्व प्रकरणाचे व मागणीचे रेकॉर्डिंग लाचलुचपत विभागाने पंचासमक्ष केले. फिर्यादी फरताडे यांनी 75 हजार नाहीत म्हणल्यावर राठोड यांनी स्वतःसाठी 20 हजार व खेडकर साहेब यांचे 40 हजार असे 60 हजार द्या असे सांगितले, हे संभाषण रेकॉर्ड सुद्धा झाले. राठोड यांनी 500 रुपयांच्या 80 नोटा असे 40 हजार व 200 रुपयांच्या 100 नोटा असे 20 हजार, असे मिळून 60 हजार लाच स्वीकारली. संभाषणनुसार राठोड यांनी खेडकर यांच्यासाठी 40 हजार मागितले मात्र त्यांना आरोपी केले नाही.
खेडकर यांना त्यावेळी अभय दिल्याचा आरोप फरताडे यांनी केला. संभाषणात खेडकर यांचे नाव होते, राठोड याने 20 हजार स्वतःसाठी मागितले व 60 हजार घेतले, त्यामुळे ते 40 हजार कोणाचे ? त्यावेळी गुन्हा नोंद झाल्यावर खेडकर यांच्या अपसंपदेची चौकशी केली असती तर खेडकर यांचा कोट्यावधी किमतीची मालमत्ता समोर आली असती, त्यामुळे आता त्यांची या प्रकरणात चौकशी करुन आरोपी करावे व संपत्तीची चौकशी करण्याची मागणी फरताडे यांनी केली आहे.राजकीय वरद हस्तामुळे यावेळी खेडकर याच्यावर कारवाई झाली नसल्याचा आरोप फरताडे यांनी केला आहे.
वरिष्ठ अधिकारी हे कनिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत लाचेची मागणी करतात व लाचेची रक्कम ही कनिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत स्वीकारतात. ट्रॅपवेळी कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांचे नाव घेतो व रक्कम सुद्धा सांगतो मात्र रेकॉर्डिंमध्ये वरिष्ठ अधिकारी यांचा आवाज नसल्याचा फायदा होतो व त्यांना आरोपी करता येत नाही, याचं तांत्रिक मुद्यामुळे ते वाचतात व कनिष्ठ हे बकरा ठरतात. अनेक प्रकरणात लाचलुचपत विभाग वरिष्ठ अधिकारी यांच्या संपत्तीची चौकशी करीत नाही.
सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांची कारकीर्द मुलगी पुजा सारखीच वादग्रस्त व भ्रष्टाचाराच्या आरोपाने गाजलेली आहे, दिलीप यांना 2 वेळेस निलंबित करण्यात आले आहे. 2019 साली सुप्रभा पॉलिमरकडे 20 लाख मागुन 13 लाख घेतल्याची तक्रार, कोल्हापूर, सातारा, मुंबई येथील अनेक प्रकरणात त्याच्या विरोधात तक्रारी होत्या.
खेडकर यांनी अहमदनगर लोकसभा वंचित बहुजन आघाडीकडुन लढवली असुन निवडणुक आयोगाच्या शपथपत्रात त्यांनी 40 कोटींची मालमत्ता असल्याचे दाखवले आहे. खेडकर यांचे चिन्ह चहाची केटली होती त्यांचे डिपॉजिट जप्त झाले होते. भाजप महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढतीत निलेश लंके 28 हजार मतांनी विजयी झाले तर खेडकर यांना 13,749 मते पडली.