धाराशिव – समय सारथी
शेतजमिनीचा फेरफार मंजुर करुन घेण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एका तलाठ्याला 4 वर्षाची शिक्षा धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश अंजु शेंडे यांनी सुनावली आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील धन्वंतर नागनाथ गायकवाड यांना लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे त्यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कलम 7,8, 13(1)(ड) सह 13(2) ला.प्र. अधिनियम, सन 1988 अन्वये 2015 साली गुन्हा नोंद झाला होता.
तक्रारदार शिवाजी चव्हाण, रा. चव्हाणवाडी ता. तुळजापूर यांना त्यांच्या नातेवाईकांच्या शेतजमिनीचा फेर मंडळ अधिकारी यांच्याकडून मंजूर करून घेऊन तसा 7/12 उतारा देण्यासाठी तलाठी गायकवाड यांनी 2 हजार रुपयांची मागणी करून पंचा समक्ष स्वीकारले होते. यात तत्कालीन तपासी अधिकारी आसिफ शेख यांनी काम पाहिले. सरकारी अभियोक्ता पी के जाधव, पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस शिपाई जे. ए. काझी यांनी काम पाहिले.
गायकवाड यांना कलम 7 अन्वये 3 वर्ष कारावास व 1000/-रू दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कारावास तर कलम 13(1)(ड), 13 (2) अन्वये 4 वर्ष कारावास व 1,000/- दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.