नियोजन समितीची बैठक – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत 14 ऑक्टोबरला घेणार आढावा
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक 14 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी दुपारी अडीच वाजता नियोजन समितीच्या नियोजन भवन येथे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा सचिव सचिन ओंबासे यांच्यासह समितीचे सदस्य या बैठकीसाठी हजर राहणार आहेत. पालकमंत्री झाल्यावर डॉ सावंत यांची व जिल्हाधिकारी ओंबासे यांची ही पहिली नियोजन बैठक आहे.
7 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालनास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक नियोजन योजना 2021-2022 माहे मार्च 2022 अखेर खर्चास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 माहे सप्टेंबर 2022 अखेर खर्चाचा आढावा यासह इतर विषयावर चर्चा व निर्णय घेण्यात येणार आहेत.
राजकीय सत्तातरच्या काळात महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिलेल्या अनेक कामांना स्थगिती देण्यात आली होती. त्या अनुषंगाने नियोजन समितीत काय निर्णय होतात हे पाहावे लागेल तसेच नियोजन समितीच्या अनेक कामाबाबत तक्रारी असून त्यावर निर्णय, अखर्चित निधी व त्याचे नियोजन यावर चर्चा व निर्णय होणार आहेत.