धाराशिव – समय सारथी
मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथील धनगर समाजाच्या आंदोलक बांधवांशी फोनवरून संपर्क साधला व त्यांना पाठिंबा देत आधार दिला, आंदोलकानी तब्येतीची काळजी घ्यावी असे ते म्हणाले. प्रत्येक सरकारने आम्हाला फसविले त्यामुळे आम्ही शेवटचा लढा म्हणुन आमरण उपोषणाला बसलो असल्याचे आंदोलकांनी जरांगे यांना सांगितले. जरांगे यांच्याशी संवाद साधताना तरुण भावुक झाले होते, तब्येतीची काळजी घ्या असे ते एकमेकांना म्हणाले.
तुमच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी कोणी आले होते का ? असे जरांगे यांनी आंदोलकाना विचारले. त्यावर प्रशासन आल्याचे सांगितले मात्र त्यांनी उद्रेक होईपर्यंत अंत पाहू नये असे सांगितले. आंदोलकांनी जरांगे यांना धाराशिव येथील आंदोलनस्थळी येण्याची विनंती केली त्यावर जरांगे यांनी सांगितले की मी तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका. मी पुन्हा आमरण उपोषण सुरु करीत आहे त्यामुळे मी नाही आलो तरी सोबत आहे, मी तुमचा विषय लावुन धरतो असे आश्वासन दिले.
धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या एसटी प्रवर्गात समाविष्ट करुन आरक्षण द्यावे व त्या आरक्षणाची अंमलबजावणी करून त्वरीत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्याम तेरकर,कमलाकर दाणे, समाधान पडुळकर व राजू मैंदाड हे 4 युवक आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 3 रा दिवस असुन उपोषणाला धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळाल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षापासून धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचा संघर्ष चालू आहे, त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून धाराशिव येथे अमरण उपोषण चालू आहे.