डॉ पद्मसिंह पाटील यांचा शेतकऱ्यांनी केला सत्कार – पाण्यासाठी विरोध पत्कारला, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची पोस्ट
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्याचे माजी पाटबंधारे मंत्री डॉ पदमसिंह पाटील यांचा घरी जाऊन सत्कार केला. यातील बहुतांश शेतकरी हे डॉ पाटील यांच्या काळातील असून त्यांचे डॉ पाटील यांच्याशी असलेले स्नेह व ऋणानुबंध या कौटुंबिक सत्कार सोहळ्यातून दिसून आल्याने काही काळ भावनिक वातावरण निर्माण झाले होते. डॉ पाटील हे तब्येतीच्या कारणाने सध्या जास्त सक्रीय नसतात मात्र त्यांचा मानणारा वर्ग व जनसंपर्क यातून दिसून आला. डॉ पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पोस्ट केली असून त्यातून डॉ पाटील व शेतकरी यांच्या नात्याचा उलघडा केला आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्यांच्या फेसबुक या समाज माध्यमावर पोस्ट केली आहे त्यानुसार जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट दूर करणारे दूरदर्शी नेतृत्व, माजी पाटबंधारे मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांचा जिल्ह्यातील शेतकरी बांधवाकडून कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. २००४ – ०५ साली डॉक्टर पाटील हे पाटबंधारे मंत्री असताना पश्चिम महाराष्ट्रातील तत्कालीन नेत्यांचा विरोध पत्करून, जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आपले राजकीय अस्तित्व पणाला लाऊन, हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आक्रमकपणे मंजूर करून घेतला होता असे आमदार पाटील म्हणाले.
कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने हक्काचे शाश्वत पाणी दृष्टिक्षेपात आले आहे. या प्रकल्पाला २०१४ ते २०१९ या फडणवीस सरकारच्या काळात चांगला वेग आला होता तसेच आता महायुतीचे सरकार आल्यानंतर यासंदर्भातील सुधारित प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने २०२४ पर्यंत पाणी मिळण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी वर्ग यामुळे सुखावला आहे. जिल्हा समृद्ध होण्यासाठी या योजनेमुळे मोठे सहकार्य होणार आहे. शेतकरी बांधवांचा स्वयंस्फूर्त पाठिंबा हीच तर कार्याची प्रेरणा आहे. डॉक्टर साहेबांनी सुरू केलेले कार्य पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्याचा आपला निर्धार आहे असे आमदार पाटील यांनी म्हणटले आहे.