धाराशिव – समय सारथी
मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे 10 जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीसाठी धाराशिव शहरात येणार असुन याचे नियोजन करण्यासाठी 9 जुलै रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या स्वप्नराज मंगल कार्यालय येथे होणार आहे. मराठा स्वयंसेवक ह्या रॅलीचे नियोजन करणार असुन त्याच्या तयारी व महत्वपूर्ण सुचना व जबाबदारी देण्यासाठी ही बैठक महत्वाची आहे त्यामुळेच मराठा समाज सेवक यांनी हजर राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महिला व पुरुष स्वयंसेवकाची टीम तयार करण्यात आलेली आहे त्यासाठी टी-शर्ट आयडेंटी कार्ड व विशेष कोड ही देण्यात आलेली आहेत.
धाराशिव शहर रॅलीसाठी सज्ज झाले असुन 1 हजार स्वयंसेवक सज्ज असुन 200 महिला स्वयंसेवक असणार आहे. आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात आली असुन रॅली मार्गात सर्वत्र भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत. शहरातील प्रत्येक चौकात स्वागताचे व जनजागृती करणारे कटआउट उभारले आहेत. 1 हजार घोषणा फलक व 100 महापुरुषांचे फलक असणार आहेत. शहरात 250 ध्वनीक्षेपक बसाविण्यात आले आहेत. मराठासेवकांनी प्रत्येक गावात जाऊन केली जनजागृती व मूळ पत्रिकांचे वाटप केले आहे त्यामुळे भगवे वादळ तयार झाले आहे, आता प्रतीक्षा आहे ती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आगमन व स्वागताची.
मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीला सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर चौकातून होणार आहे.शांतता रॅली अहिल्यादेवी होळकर चौकातुन अण्णाभाऊ साठे चौक, श्री धारासुर मर्दिनी, हजरत खाजा शमशुद्दीन गाझी दर्गा ,विजय चौक, नेहरू चौक काळा मारुती चौक संत गाडगेबाबा चौक येथे येईल येथून महिला भगिनी या रॅलीत सहभागी होऊन,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आल्यानंतर मनोज जरांगे पाटील शांतता रॅलीला मार्गदर्शन करतील.